न्यूझीलंड : 4 मार्चपासून महिला क्रिकेट वर्ल्डकप सुरु होणार आहे. याअगोदर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर गेली असून चौथ्या वनडेमध्येही टीमला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. यानंतर टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने एक मोठं विधान केलं आहे. मितालीच्या म्हणण्याप्रमाणे, वर्ल्डकप जिंकण्याने महिला क्रिकेटविषयी भारतीय फॅन्सचा दृष्टीकोन बदलेलं.
2017 साली इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपमध्ये टीम वर्ल्डकप जिंकण्याच्या एक हात दूर होती. मात्र इंग्लंडने भारताला हरवून वर्ल्डकप काबिज केला. भारतीय महिला क्रिकेटसाठी तो एक मोठा टप्पा ठरला आणि चाहत्यांचा दृष्टीकोन बदलला होता.
"मला आजंही 2017 च्य़ा वर्ल्डकपचा फायनल सामना चांगला लक्षात आहे. आम्ही जिंकण्याच्या खूप जवळ होतो. लॉड्स स्टेडियमच्या फुल हाऊस क्राऊडमध्ये फायनल सामना हरणं अजूनही दुःख देऊन जातं. पण माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे की, टीम इंडियाला मी कर्णधार असताना 3 पैकी 2 वेळा आयसीसी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचवलं," अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
फायनलमध्ये दोनवेळा हरलेल्या आठवणींना जाग करत मिताली म्हणाली, "आम्ही त्या दोन फायनल हरल्यानंतर खूप काही शिकलो आहे. त्यामुळे या वर्ल्डकप दरम्यान आम्ही चांगल्या अनुभवाने उतरणार आहोत. या विजयाचा इम्पॅक्ट खूप मोठा होईल. तसंच खेळाडू, कुटुंब आणि चाहत्यांसाठी एक मोठा बदल घेऊन येईल."