मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : तिरंदाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते दीपिका कुमारी...मात्र महाराष्ट्रातही आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज खेळाडू आहे ती म्हणजे मेघा अगरवाल...मेघा आता चीन इथं होणा-या तिरंदाजी आशियाई कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
मेघा अगरवाल...हिचं आडनाव जरी तुम्हाला अमराठी वाटत असलं तरी या तिरंदाज खेळाडूनं महाराष्ट्राची मान अनेकदा अभिमानानं उंचावलीय... मेघानं यापूर्वी थायलंड इथं झालेल्या प्रिन्सेस कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलय. तर जवळपास 20 वेळा तिनं राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राकडून खेळताना पदकांची कमाई केलीय. आता तर तिची निवड चीन इथं 3 ते 10 जुलै दरम्यान होणाऱ्या तिरंदाजी आशियाई कपसाठी झालीय. यासाठी ती सध्या कसून सराव करत असून या स्पर्धेत ती नक्कीच पदक पटकावेल अशी, आशा तिला आणि सुनिल - आशा अगरवाल या तिच्या पालकांना वाटतेय.
पुण्यात राहणाऱ्या मेघानं वयाच्या बाराव्या वर्षी तिरंदाजीचा धनुष्य हातात घेतला. मेघा पुण्यातील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकत असताना या शाळेतील क्रीडा शिक्षक रणजित चामले यांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली आणि महाराष्ट्राला ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज लाभली.
मेघा केवळ खेळातच हुशार आहे असं नाही तर अभ्यासातही तेवढीच हुशार आहे. सध्या ती एमआयटीमधून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये बॅचलर डिग्रीच्या दुसऱ्या वर्गात आहे. आता तिरंदाजी आशियाई कपमध्ये मेघा पदकाला गवसणी घालून पुन्हा एकदा महाराष्ट्राची आणि भारताची मान अभिमानाने उंचावील अशी आशा करुया...