'अनेकांनी माझा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला पण...' दानिश कनेरियाचा आरोप

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. 

Updated: Jan 31, 2020, 05:23 PM IST
'अनेकांनी माझा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला पण...' दानिश कनेरियाचा आरोप title=

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. अनेकांनी माझा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्यांना यश आलं नाही, असं दानिश कनेरिया म्हणाला आहे. दानिश कनेरियाने ट्विटरवर #AskDanish या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

'तू इस्लाम कबूल कर. इस्लाम भगवान आहे. इस्लामशिवाय काहीच नाही. तुझं आयुष्य मरणासारखं आहे,' अशी प्रतिक्रिया आमना गुल नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आली. दानिश कनेरियाने यावर उत्तर दिलं. 'तुमच्यासारख्या अनेकांनी माझा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये ते अपयशी ठरले,' असं दानिश म्हणाला.

हिंदू असण्याचा मला अभिमान आहे, तसंच मी पाकिस्तानमध्ये पूर्णपणे सुरक्षित आणि आनंदी आहे, असंही दानिश कनेरियाने सांगितलं. अनेकांनी मॅच फिक्सिंग करुन देश विकला, पण त्यांचं टीममध्ये पुनरागमन झालं. मी कधीच माझ्या देशाला विकलं नाही, असं दानिश कनेरियाने सांगितलं.

दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून खेळलेला दुसरा हिंदू क्रिकेटपटू आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कनेरियावर आयुष्यभराची बंदी घातली आहे.

हिंदू असल्यामुळे दानिश कनेरियावर अन्याय करण्यात आला. पाकिस्तानच्या खेळाडूंना कनेरिया हिंदू असल्यामुळे त्याच्यासोबत जेवायलाही आक्षेप होता, असं धक्कादायक वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केलं होतं. दानिश कनेरियानेही शोएब अख्तरच्या या आरोपांना दुजोरा दिला. योग्यवेळी या व्यक्तींची नावं जगजाहीर करु, असं कनेरियाने सांगितलं.