नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीवर मध्य प्रदेश संघाने नाव कोरले आहे. मध्य प्रदेशने 6 विकटसने मुंबईचा पराभव करत रणजी ट्रॉफी उंचावली आहे. मध्य प्रदेशने प्रथमच ट्रॉफी उंचावत इतिहास रचला आहे. पराभवामुळे 42 व्या वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यास मुंबई अपयशी ठरलाय.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा 6 विकेट्स राखून पराभव केला.मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडक जिंकला आहे. दरम्यान 1999 मध्ये चंद्रकात पंडितच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशने अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांचा कर्नाटककडून 96 धावांनी पराभव झाला होता. तेच चंद्रकात पंडित सध्या मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक आहेत. यानी याच प्रशिक्षकांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशने रणजी ट्रॉफी जिंकली आहे.
पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रातच मुंबईने आपल्या उर्वरित आठ विकेट गमावल्या, त्यामुळे मुंबईचा दुसरा डाव २६९ धावांवर आटोपला. मुंबईसाठी दुसऱ्या डावात सुवेद पारकरने ५१ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी संघाकडून सरफराजने 45 आणि कर्णधार पृथ्वी शॉने 44 धावा केल्या. एमपीकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
मुंबईने दुसऱ्या डावात मध्यप्रदेशला 108 धावांचे लक्ष्य दिले होते. मध्यप्रदेशने 108 धावांचे लक्ष्य सहज गाठले. मध्यप्रदेशसाठी दुसऱ्या डावात हिमांशू मंत्रीने सर्वाधिक 37 धावांचे योगदान दिले तर दुसरीकडे शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी 30-30 धावांची खेळी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. सरफराज खानने शानदार फलंदाजी करताना १३४ धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वालने 78 आणि पृथ्वी शॉने 47 धावांचे योगदान दिले. मध्यप्रदेशच्या गौरव यादवला चार आणि अनुभव अग्रवालला तीन विकेटस मिळाली.
374 धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावांत आटोपला. रजत पाटीदार, शुभम शर्मा आणि यश दुबे यांनी या चमकदार कामगिरी करत उत्कृष्ट योगदान दिले. रजत पाटीदारने 122 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात 20 चौकारांचा समावेश होता. तर यश दुबेने 133 आणि शुभम शर्माने 116 धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानीने सर्वाधिक ५ बळी घेतले होते.
रणजी ट्रॉफीच्या 67 वर्षांच्या इतिहासात मध्य प्रदेशचा संघ फक्त दुसरा फायनल खेळत होता. त्याचवेळी 41वेळा चॅम्पियन मुंबईचा सांघिक विक्रम हा 47वा अंतिम सामना होता. या सामन्यात मध्य प्रदेशने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 67 वर्षांच्या इतिहासात मध्य प्रदेशने प्रथमचं ट्रॉफी उंचावली आहे.