मुंबई : स्टार खेळाडू आणि फुटबॉलचा देव मानला जाणाऱ्या लिओनेल मेस्सीचा फुटबॉल क्लब बार्सिलोनासोबतचा करार अखेर संपुष्टात आला आहे. गेल्या 20 वर्षांपासून मेस्सी बार्सिलोना टीमचा एक भाग होता. 30 जून रोजी मेस्सीचा बार्सिलोना सोबतचा करार संपला. या डेडलाईनपूर्वी बार्सिलोना क्लबला मेस्सीसोबत नवा करार करणं गरजेचं होतं. मात्र बार्सिलोना क्लब यासाठी अपयशी ठरला.
दरम्यान गेल्या वर्षी लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी क्लबने नकार दिल्यामुळे त्याला टीम सोडणं शक्य झालं नाही. मात्र त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील करार संपुष्टात आल्याने मेस्सी आता इतर कोणत्याही क्लबकडून खेळण्यासाठी स्वतंत्र आहे.
बार्सिलोनासोबत पुन्हा करार न झाल्याने 7504 दिवसांमध्ये पहिल्यांदाच कराराशिवाय सामील होणार आहे. मेस्सी त्याच्या फुटबॉलच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कोणत्याही क्लबसोबत नाहीये. दरम्यान मेस्सी पुन्हा बार्सिलोना टीममध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, लिओेनेल मेस्सी आणि बार्सिलोना क्लबमध्ये अजूनही अनेक मुद्द्यांवर वाद आहे. करार संपल्यानंतर मेस्सीने पुन्हा टीममध्ये येण्यास नकार दिल्याने क्लबसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. इतकंच नाही तर मेस्सीने बार्सिलोना क्बल सोडला तर त्याच्या जाण्याने क्लब आर्थिक अडचणीत येण्याचीही शक्यता आहे.
यापूर्वी जेव्हा मेस्सीने क्लब सोडण्याची इच्छा वर्तवल्यानंतर टीमवर त्याचे परिणाम दिसून आलेले. चॅम्पियन लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिच टीमकडून 8-2 ने पराभव सहन करावा लागला होता. मेस्सीच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा पराभव मानला जातो.