कोलंबो : २०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयाच्या ९ वर्षानंतर श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंदा अलुथगामगे यांनी ही मॅच फिक्स असल्याचा आरोप केला होता. वर्ल्ड कप फायनलच्यावेळी अलुथगामगे श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यामुळे श्रीलंकेच्या सरकारने या आरोपांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. याच चौकशीचा भाग म्हणून त्यावेळचा श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची चौकशी करण्यात आली आहे.
कुमार संगकाराची क्रीडा मंत्रालयाच्या स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटने १० तास कसून चौकशी केली. त्याआधी श्रीलंका टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष राहिलेल्या अरविंदा डिसिल्वा यांचीही चौकशी करण्यात आली.
महिंदानंदा अलुथगामगे यांनी फिक्सिंगचे आरोप करताना कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. तरीही श्रीलंका सरकारकडून याची चौकशी केली जात आहे. संगकाराच्या चौकशीदरम्यान श्रीलंकेतल्या एका युवा संघटनेचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर उपस्थित राहून निदर्शनं करत होते. एका महान क्रिकेटपटूला कारण नसताना त्रास दिला जात असल्याचा आरोप, या कार्यकर्त्यांनी केला आहे.
महिंदानंदा अलुथगामगे यांनी पहिल्यांदा याबाबत आरोप केल्यानंतर कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली होती. 'निवडणुका जवळ आल्या आहे का? सर्कस सुरू झाली आहे. नावं आणि पुरावे कुठे आहेत?' असा प्रश्न महेला जयवर्धनेने विचारला. तर दुसरीकडे 'याबाबतचे पुरावे आयसीसीकडे आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे घेऊन जावे, त्यामुळे आरोपांची सखोल चौकशी होईल', अशी मागणी संगकाराने केली होती.
He needs to take his “evidence” to the ICC and the Anti corruption and Security Unit so the claims can be investigated throughly https://t.co/51w2J5Jtpc
— Kumar Sangakkara (@KumarSanga2) June 18, 2020
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या मॅचमध्ये श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेने शतक करून श्रीलंकेचा स्कोअर २७४/६ पर्यंत पोहोचवला होता. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सचिन, सेहवाग आणि विराट कोहलीच्या विकेट ३१ रनवरच गमावल्या होत्या. सुरुवातीच्या धक्क्यानंतर गौतम गंभीर आणि धोनीने १०९ रनची पार्टनरशीप करून भारताला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकवून दिला.