KKR Vs RCB : आरसीबीच्या दिग्गजांवर केकेआरचे युवा खेळाडू पडले भारी; कोलकात्याचा पहिला विजय

 कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात केकेआरने आरसीबीवर मोठा विजय मिळवला आहे.

Updated: Apr 6, 2023, 11:16 PM IST
KKR Vs RCB : आरसीबीच्या दिग्गजांवर केकेआरचे युवा खेळाडू पडले भारी; कोलकात्याचा पहिला विजय title=

KKR Vs RCB : कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात केकेआरने आरसीबीवर मोठा विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर बंगळरूचा 81 रन्सने पराभव झाला आहे. यंदाच्या सिझनमधील कोलकात्याच्या टीमचा हा पहिला विजय होता. केकेआरच्या गोलंदाजांसमोर आरसीबीची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. अवघ्या 123 रन्सवर आरसीबीची संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली.

केकेआरच्या गोलंदाजीपुढे आरसीबीचे फलंदाज ढेर

केकेआरने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली मैदानात उतरले होते. यावेळी दोघांनीही चांगली सुरुवात करून दिली. मात्र 21 रन्सवर असताना विराट कोहली बोल्ड झाला आणि त्यानंतर एकंही फलंदाज दिर्घकाळ क्रिजवर टिकला नाही. 

विराटची विकेट गेल्यानंतर कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस देखील बोल्ड झाला आणि 23 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतला. मायकल ब्रेसवेल 19, डेविल विली 20 आणि आकाश दीप 17 रन्स करू शकले. याशिवाय कोणत्याही खेळाडूला दुहेरी स्कोर करता आला नाही. यामध्ये केकेआरकडून वरूण चक्रवर्तीने 4, सुयश शर्मा 3, सुनिल नारायण 2 आणि शार्दूलने एक विकेट घेतली.

आरसीबीला जिंकण्यासाठी 205 रन्सचं आव्हान

कोलकाताच्या टीमने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 204 रन्स केले. कोलकाताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 68 रन्स केले. तिथे रिंकू सिंगने 46 रन्सची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 102 रन्सची पार्टनरशिप केली. या दोघांच्या पार्टनरशिपमुळे कोलकात्याच्या टीमला 200 हून अधिक रन्स करणं शक्य झालं. 

कोलकाता नाईड रायडर्सकडून रहमानउल्ला गुरबाजनेही 57 रन्स केले. मात्र या तिघांशिवाय कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. दरम्यान आरसीबीकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले आहेत.

शार्दुल ठाकूरचा जलवा 

शार्दुल ठाकूरने 20 बॉल्समध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 29 बॉल्समध्ये 68 रन्स करत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. पुन्हा एकदा कठीण परिस्थितीत शार्दुल ठाकूर टीमसाठी ट्रबलशूटर बनला होता. यावेळी केकेआरचे चाहतेही खुश होते.