Virat Kohli In Team India: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा 21 ऑगस्ट रोजी झाली. या स्पर्धेसाठी 17 खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. या संघाचा सराव 24 ऑगस्टपासून सुरु बंगळुरुमध्ये सुरु होणार आहे. आशिया चषकाबरोबरच 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धाही सुरु होणार आहे. भारतीय संघाचे सलामीवीवर म्हणून कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि ईशान किशन यांचा विचार केला जात आहे. त्यामुळेच मधल्या फळीमधील जागा भरुन काढण्यासाठी विराट कोहलीला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर पाठवण्यासंदर्भातील सल्ला अनेक दिग्गजांनी दिला आहे. असा सल्ला देणाऱ्यांमध्ये माजी भारतीय प्रशिक्षक रवि शास्त्री यांचाही समावेश आहे. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे या विचाराशी सहमत नाहीत. मांजरेकर यांनी 2007 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरच्या वाईट कामगिरीची आठवण करुन देत विराटबरोबर प्रयोग नको असा सल्ला दिला आहे.
संजय मांजरेकर यांनी, विराट कोहलीला बळीचा बकरा बनवला जात आहे असं 'स्टार स्पोर्ट्स'च्या मुलाखतीमध्ये सांगितलं. 2007 मध्ये सचिन तेंडुलकरबरोबर काय झालं होतं आठवतंय अशी आठवणही मांजरेकर यांनी करुन दिली आहे. आपण ईशान किशन आणि इतर खेळाडूंना वरच्या क्रमांकावर खेळवण्याबद्दल विचार केला तर विराट कोहलीला तितक्याच खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवावं लागेल, असं मांजरेकर म्हणाले. हा साऱ्या प्रयोगांमध्ये विराट कारण नसताना बळीचा बकरा ठरेल, अशी शक्यताही मांजरेकरांनी व्यक्त केली. तुम्ही त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचा विचार करत आहात कारण तुम्हाला त्या जागी भरोश्याचा फलंदाज हवा आहे असं सांगतानाच मांजरेकर यांनी विराटच्या खेळावर याचा परिणाम होईल असा इशारा दिला आहे. रवि शास्त्रींबरोबरच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मूडी यांनीही विराटला चौथ्या क्रमांकावर खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे.
संजय मांजरेकर यांनी चौथ्या क्रमांकावरील खेळाडूचा प्रश्न यापूर्वीही भारतीय संघासमोर होता असं म्हणत थेट 2007 मधील विश्वचषकातील सचिनच्या कामगिरीवर बोट ठेवलं. 2007 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये कर्णधार राहुल द्रविड आणि प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्या संघ व्यवस्थापनाने सचिन तेंडुलकरला सलामीला पाठवण्याऐवजी चौथ्या क्रमांकावर पाठवलं होतं. सलामीला विरेंद्र सहेवाग आणि इतर खेळाडू असल्याने सचीनला खालच्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. मात्र त्यामुळे वाद निर्मा झाला. त्यामुळेच विराटला स्वत:ला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. विराटच्या इच्छेप्रमाणे निर्णय घ्यावा हा सर्वात सोपा मार्ग आहे. रवि शास्त्रींनी काही दिवसांपूर्वी चौथ्या क्रमांकावर विराटची कामगिरी उत्तम असून तसं आकडेवारीच सांगते असं म्हटलं आहे. माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांनी मात्र विराटला तिसऱ्या क्रमांकावरच खेळवावं असं म्हटलं आहे.
नक्की पाहा >> Video: विराटसंदर्भातील रोहितचं 'ते' विधान ऐकून Chief Selector आगरकरसहीत सगळेच हसू लागले
2007 मधील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघांची कामगिरी फारच सुमार होती. भारतीय संघ साखळी फेरीमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला होता. सचिन 2 सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेला. या 2 सामन्यांमध्ये सचिनने बांगलादेशविरुद्ध 7 आणि श्रीलंकेविरुद्ध शून्य धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यांमध्ये भारत पराभूत झाला होता. भारताला केवळ बर्म्युडाविरुद्ध विजय मिळाला होता. या मालिकेमध्ये वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि रॉबिन उथप्पा या तिघांनी पहिल्या 3 क्रमांकावर फलंदाजी केली होती.
नक्की वाचा >> Asia Cup स्पर्धेत Mumbai Indians चा संघ भारताकडून खेळणार! सोशल मीडियावर टीकेची झोड
मागच्या वर्ल्डकपस्पर्धेनंतर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करतोय. मात्र सध्या तो जखमी आहे. त्यामुळेच त्याच्या उपलब्धतेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. तसेच भारतीय संघाकडे चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माचाही पर्याय उपलब्ध आहे. रोहित शर्माने आशिया चषकासाठी संघ निवडल्यानंतर पत्रकरांशी बोलताना तिसऱ्या क्रमांकावर आहे तो खेळाडूच खेळेल असं सांगत विराटच तिसऱ्या क्रमांकावर असेल असं सूचक विधान केलेलं. चौथ्या आणि पाचव्या क्रमाकांवरील खेळाडूची जागा बदलू शकते. आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध तर 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध मैदानात उतरणार आहे.