'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.

सौरभ तळेकर | Updated: Sep 5, 2024, 05:11 PM IST
'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा! title=
KL Rahul On Anushka Sharma

Cricket News : टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू केएल राहुल सध्या खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलला कमाल दाखवता आली नसल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. तर अनेकदा त्याच्यावर ट्रोलिंग देखील झालं. वनडे वर्ल्ड कपनंतर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला अन् नंतर त्याला कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता केएल राहुल पुन्हा टीम इंडियामध्ये पुनरागमनाची संधी शोधत आहे. अशातच आता केएल राहुलने अनुष्का शर्माचा एक किस्सा शेअर केलाय.

काय म्हणाले KL Rahul? 

केएल राहुलने एका टॉक शोमध्ये अनुष्का शर्मावर भाष्य केलं. अनुष्का शर्मा लग्न होण्याआधी क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी येत होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनुष्का क्रिकेटर्स थांबत असलेल्या हॉटेलमध्ये थांबायची. विराट आणि अनुष्का 2014 मध्ये एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी माझा बॅड पॅच सुरू होता, असं म्हणत राहुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा सांगितला.

माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. मेलबर्न टेस्ट सुरू असताना आम्ही एकदा हॉटेलमध्ये होतो. तेव्हा मी माझ्या फलंदाजीच्या फॉर्ममुळे चिंतेत होतो. मला दु:ख होत होतं आणि मी हताश देखील झालो होतो. अनुष्काला माझी काळजी होती, तिला माझ्या देहबोलीमधून सर्वकाही समजत होतं. त्यावेळी विराट आणि अनुष्का माझे खूप चांगले मित्र होते. दोघंही माझ्याशी चांगले वागायचे. मैत्रीच्या काळजीपोटी अनुष्काला देखील वाईट वाटलं असावं, असं राहुल म्हणतो.

एकदा अनुष्का माझ्या रुममध्ये आली. त्यावेळी मी रुममध्ये एकटाच बसलो होतो. अनुष्काने तिच्याच अंदाजात मला सांगितलं की तू इथं एकटं बसायचं नाही. तू तुझ्या खराब फॉर्मविषयी विचार करत बसशील आणि त्रास करुन घेशील. विराट आणि मी जेवायला चाललोय, तूला इथं बसून चालणार नाही, तू आमच्यासोबत बाहेर येतोय. त्यानंतर मी दोघांसोबत त्यांच्याच डेटवर गेलो, असं केएल राहुल म्हणाला.

दरम्यान, दोघांनी मला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्यांच्या वाईट काळात संकटावर कशी मात केली, याचे किस्से सांगितले. त्यानंतर मला खूप बरं वाटलं. माझ्यामधली नकारात्मता कमी झाली, असं राहुल सांगतो. अनेकदा त्यांनी मला बाहेर जेवायला नेलं. त्यावेळी दोघांनी मला खूप मदत केली. मला वाईट काळात देखील सकारात्मक राहण्याचं गमक त्यांनी सांगितलं, असा किस्सा राहुलने यावेळी सांगितला.