पंजाबचं जोरदार कमबॅक, केएल राहुल आणि कुंबळेचं गावस्करांकडून कौतूक

पंजाबला प्ले ऑफमध्ये जाण्याची मोठी संधी

Updated: Oct 27, 2020, 03:19 PM IST
पंजाबचं जोरदार कमबॅक, केएल राहुल आणि कुंबळेचं गावस्करांकडून कौतूक title=

दुबई : आयपीएल २०२० मध्ये आता आणखी रंगतदार सामने पाहायला मिळणार आहे. कारण आता प्लेऑफमध्ये जाग मिळवण्यासाठी सर्वच सर्वशक्ती पणाला लावणार आहे. कर्णधार केएल राहुल आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना शेवटच्या काही सामन्यांमध्ये पंजबाच्या विजयाचे श्रेय दिलं जात आहे. सुनील गावस्कर यांनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे.

सलग 5 सामने गमावल्यानंतर पंजाब सर्वात शेवटच्या क्रमांकावर होती. पण त्यानंतर त्यांनी सलग 5 सामने जिंकत 12 गुणांसह चौथा क्रमांक गाठला आहे. पंजाब आणखी 2 सामने खेळणार आहे आणि त्यांच्याकडे आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची मोठी संधी आहे.

गावस्कर म्हणाले की, त्यांना विजयाचा मार्ग सापडला आहे. स्पर्धेच्या सुरूवातीस असे वाटत होते की ते साध्य करू शकले नाहीत. प्रत्येक वेळी ते विजयाच्या जवळ आले, शेवटच्या ओव्हर्समध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर, त्यांना किल्ली सापडली ज्यामुळे त्यांनी सामने जिंकले.'

केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने यशस्वीरित्या 126 धावांचा बचाव केला. याबाबत गावस्कर म्हणाले, 'शेवटच्या सामन्यात 126 धावांच्या बचावासाठी बरेच काही करण्याची गरज होती. आत्मविश्वास दाखविण्याची गरज होती आणि त्यांनी तसे केले. केएल राहुलने चांगले नेतृत्व केले.'

गावस्कर म्हणाले की, 'राहुल कर्णधारपदाच्या भूमिकेत परिपक्व झाला आहे. अनिल कुंबळेच्या भूमिकेकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. कुंबळे हा त्याच्या कारकिर्दीत एक फायटर होता. तुम्हाला आठवत असेल की तो जबडा फुटल्यानंतरही वेस्ट इंडीजविरुद्धच्या 2002 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात गोलंदाजीसाठी मैदानात उतरला होता आणि ही भावना किंग्ज इलेव्हनच्या संघात दिसून येते. ते परत आले आणि आता ते प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहेत.'