IPL सुरु होण्याआधीच KKR ला मोठा धक्का! कर्णधार श्रेयस अय्यरचं 'ते' धाडस संघाला नडणार?

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 खेळू शकला नव्हता. रणजी ट्रॉफीदरम्यान त्याची पाठ पुन्हा एकदा त्रास देत आहे. यामुळे तो अंतिम सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळला नाही.   

शिवराज यादव | Updated: Mar 14, 2024, 11:42 AM IST
IPL सुरु होण्याआधीच KKR ला मोठा धक्का! कर्णधार श्रेयस अय्यरचं 'ते' धाडस संघाला नडणार? title=

IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी आता मोजके दिवस उरले असताना सर्व संघ कसून तयारी करत आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला स्पर्धा सुरु होण्याआधी मोठा धक्का बसला आहे. याचं कारण कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमधून बाहेर पडू शकतो. पाठीच्या दुखापतीमुळे तो पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. याच दुखापतीमुळे तो आयपीएल 2023 ही खेळू शकला नव्हता. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरने 95 धावांची खेळी केली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, याच खेळीमुळे त्याच्या पाठीच्या वेदना पुन्हा एकदा बळावल्या आहेत. 

गतवर्षी श्रेयस अय्यरला पाठीची सर्जरी करावी लागली होती. या सर्जरीनंतर त्याने वर्ल्डकप संघात पुनरागमन केलं होतं. यानंतर श्रेयस अय्यरने 4 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. पण आता त्याला पुन्हा एकदा पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. 

श्रेयस अय्यरला इंग्लंडविरोधातील अखेरच्या तीन कसोटी सामन्यात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामागील कारण स्पष्ट न झाल्याने वेगवेगळे अंदाज लावले जात होते. श्रेयस अय्यरने बीसीसीआयला पाठीच्या त्रासामुळे आपण त्रस्त असून याचमुळे रणजी ट्रॉफीतही खेळत नसल्याची माहिती दिली होती. 

महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या वैद्यकीय पथकाने बीसीसीआयला श्रेयस अय्यर आता खेळण्यासाठी पूर्णपणे तंदरुस्त असल्याचं सांगितलं होतं. यानंतर बीसीसीआयने वार्षिक करारातून श्रेयस अय्यरला वगळलं होतं. भारतीय संघासह रणजीतही खेळत नसल्याने ईशान किशनसह श्रेयस अय्यरवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर मात्र श्रेयस अय्यर मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळताना दिसला.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत मोठी वाटत आहे. यामुळे तो आयपीएलमधील काही सामने गमावण्याची शक्यता आहे. "त्याची दुखापत फार साधी वाटत नाही आहे. जुनीच दुखापत त्याला नव्याने त्रास देत आहे. रणजी ट्रॉफी फायनलच्या पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलचे सुरुवातीचे काही सामनेही तो गमावू शकतो," असं सूत्राने सांगितलं आहे.

रणजी ट्रॉफीत 95 धावांच्या खेळीदरम्यान, अय्यरने दोनदा वैद्यकीय मदत घेतली. यावेळी तो फार अस्वस्थ दिसत होता. चौथ्या दिवशी तो मैदानात उतरला नाही आणि त्याच दुखापतीमुळे पाचव्या दिवशीही तो अनुपस्थित असण्याची शक्यता आहे.

KKR आयपीएल 2024 चा त्यांचा पहिला सामना 23 मार्च रोजी खेळणार आहे. श्रेयस अय्यर पुढील 8 दिवसांत पूर्ण तंदरुस्त झाला नाही, तर तो सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. यादरम्यान श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त नसताना एनसीएने त्याला रणजी फायनल खेळण्याची परवानगी कशी दिली, यावर केकेआरची भूमिका पाहणं महत्त्वाचं असणार आहे.