World Cup सामन्यांवर दहशतवादी हल्ला करण्याची खलिस्तान्यांची धमकी! पन्नू म्हणाला, 'मोदींनी...'

Khalistani Terrorist Threatens Attack ODI World Cup 2023: भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धेवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 29, 2023, 08:33 AM IST
World Cup सामन्यांवर दहशतवादी हल्ला करण्याची खलिस्तान्यांची धमकी! पन्नू म्हणाला, 'मोदींनी...' title=
सोशल मीडियावर पन्नू धमकी देत असल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे

Khalistani Terrorist Threatens Attack ODI World Cup 2023: भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये 10 वेगवेगळ्या देशांचे संघ सहभागी होत आहेत. क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेली ही स्पर्धा दीड महिन्यांहून अधिक काळ सुरु राहणार आहे. विद्यमान विजेता इंग्लंडचा संघ आणि उपविजेता संघ न्यूझीलंडदरम्यान पहिला सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. एकीकडे या स्पर्धेच्या सुरक्षेसंदर्भात सर्व तयारी झालेली असतानाच या स्पर्धेवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने दिला आहे. 

वर्ल्डकप स्पर्धेवर हल्ला करण्याची धमकी

भारत आणि कॅनडामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाच्या केंद्रस्थानी खलिस्तानी चळवळ आहे. याच खलिस्तानी चळवळीला कॅनडातील अनेक संस्थांचा उघड किंवा छुपा पाठिंबा आहे. अशाच शिख्स फॉर जस्टीस नावाच्या संस्थेचा संस्थापक दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये फोन कॉलवरुन दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे कॅनडामधील राजदूत संजय कुमार वर्मा यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडोंचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. 

नक्की वाचा >> भारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'

मतपेटीमधून उत्तर देणार

"निज्जरच्या हत्येनंतर आम्ही तुमच्या गोळ्यांना मतपेटीमधून उत्तर देणार आहोत. तुमच्या हिंसेविरोधात आम्ही मतदानाची ताकद वापरणार आहोत. लक्षात ठेवा की यंदाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वर्ल्ड क्रिकेट कप सुरु होणार नाही तर वर्ल्ड टेरर कप सुरु होणार आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा हा इशारा आहे," असं पन्नू व्हायरल ऑडिओमध्ये सांगतोय. 

नक्की वाचा >> वर्ल्डकप आधी मोठा वाद! रोहितचं उदाहरण देत 25 शतकं झळकावणाऱ्याची संघातून हकालपट्टी

दूतावास बंद करावा आणि...

"भारत आणि मोदींनी पंतप्रधान ट्रूडो यांचा अपमान केला आहे. मोदी सरकारला ओटावामधील दूतावास बंद करावा आणि राजदूत वर्मा यांना मायदेशी बोलवण्याचा सल्ला देत आहोत. हा सल्ला कॅनडीयन लोकांकडून आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूकडून दिला जात आहे. पंतप्रधान ट्रूडोंचा अपमान केल्याबद्दल आम्ही राजदूत वर्मा आणि मोदींना जबाबदार धरतोय. वर्मा यांना परत बोलवून घेणं आणि ओटावामधील दूतावास बंद करणं योग्य ठरेल," असं या ऑडिओमध्ये दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू सांगत आहे. 

भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद

भारत आणि कॅनडामधील तणाव मागील काही दिवसांपासून वाढला आहे. 18 जून रोजी कॅनडामधील सुरे येथे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. निज्जर कॅनडामधील सिख फॉर जस्टिस आणि खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख होता.

नक्की वाचा >> 'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण

राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवादी असलेल्या निज्जरवर 10 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. याच मुद्द्यावरुन कॅनडाच्या पंतप्रधानांनी कॅनडीयन संसदेत केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला. या हत्येमध्ये भारताचा सहभाग होता असा कॅनडीयन पंतप्रधानांनी आरोप केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असून भारताने ते फेटाळले आहेत.