T20 World Cup 2024 : टीम इंडियाने पाचव्यांदा आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दोन वनडे वर्ल्ड कप, दोन टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन ट्रॉफी टीम इंडियाच्या नावावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वनडे, टी-ट्वेंटी आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. तर रोहितने देखील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. त्याचबरोबर 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयानंतर कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं अन् ऋषभ पंतचं कौतूक केलंय.
यंदाच्या विश्वचषकात सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. ऋषभ पंतला पाहून मला आश्चर्य वाटलं. दुखापत झाल्यानंतर ऋषभ बरा होऊन संघात परतला. किती छान परफॉर्मन्स दिलाय ऋषभने... पंतने सर्वांची मनं जिंकली आहेत, असं म्हणत कपिल देव यांनी ऋषभ पंतचं कौतूक केलं. मला त्याला कानाखाली मारावीशी वाटली कारण तू आता मोठा खेळाडू झालाय. तु खरंच किती संघर्ष केलाय. तुझ्याशिवाय टीम इंडियाने खूप संघर्ष केला, असंही कपिल देव यांनी म्हटलं आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी स्वत:ला आता वेगळं करून घेतलंय. आता आपल्याला या दोघांसारख्याच खेळाडूंना संघात घ्यावं लागेल. या दोघांनी भारतासाठी खूप मोठं योगदान दिलंय. आता वेळ आलीये की दुसरा रोहित शोधण्याची आणि दुसरा विराट शोधण्याची. असे खेळाडू जे येत्या 10 ते 15 वर्षात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करतील, असंही कपिल देव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कपिल देव यांनी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी महत्त्वाचा सल्ला दिला होता. वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी तुमचं नशीब आणि योग्य आयोजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंचं फिट राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असं कपिल देव म्हणाले होते. तसेच एखाद्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने तुम्हाला विजय मिळवून दिला आहे त्या मॅचविनर खेळाडूला तुम्ही बाहेर बसवत असाल तर हे धोक्याचं आहे, असंही कपिल देव म्हणाले होते.