IPL नंतर वनडेत ही Jos बटलरचा झंझावात कायम, रचला नवा इतिहास

आयपीएलमध्ये झंझावात खेळी करणाऱ्या जोस बटलरची धावांसाठी घौडदौड सुरुच आहे.

Updated: Jun 17, 2022, 07:41 PM IST
IPL नंतर वनडेत ही Jos बटलरचा झंझावात कायम, रचला नवा इतिहास title=

Eng VS Ned : इंग्लंड क्रिकेट संघाने शुक्रवारी नेदरलँड्सविरुद्ध ऐतिहासिक धावसंख्या उभारत नवा विक्रम आपल्या नावे केलाय. प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर, फिल सॉल्ट आणि डेव्हिड मलान यांच्या झंझावाती शतकांच्या जोरावर 50 षटकांत 4 बाद 498 धावा केल्या. इंग्लंड संघाने आपल्याच एकदिवसीय सामन्यात केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम मोडलाय.

17 जून शुक्रवारचा दिवस क्रिकेट इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला गेला. नेदरलँडच्या संघाविरुद्ध इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. संघाच्या एक-दोन नव्हे तर तीन फलंदाजांनी शतकं झळकावली. पदार्पण करणाऱ्या फिलने शतक झळकावले, त्यानंतर संघाच्या अनुभवी मलाननेही शतक झळकावले. या दोघांशिवाय बटलरने धमाका केला आणि लियाम लिव्हिंगस्टोननेही झटपट अर्धशतक केले.

बटलरचं झंझावाती शतक

बटलरने 27 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर 47 चेंडूत 8 चौकार आणि षटकारांची संख्या 6 वर पोहोचली आणि शतक पूर्ण केले. त्याने 65 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकार मारत 150 धावा पूर्ण केल्या. इंग्लंडकडून सर्वात जलद शतक बटलरच्या नावावर आहे, जे त्याने 2015 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 46 चेंडूत झळकावले होते.
बटलरच्या 14 षटकारांनी इतिहास रचला.

इंग्लंडच्या संघाने पुन्हा एकदा वनडेत बादशाह असल्याचे सिद्ध केले. 481 धावांची स्वतःची सर्वोच्च धावसंख्या मोडत 498 धावांचा नवा विश्वविक्रम केला. यामध्ये संघाचा मधल्या फळीतील फलंदाज बटलरचा सर्वात मोठा वाटा होता. अवघ्या 70 चेंडूत 162 धावांची खेळी खेळत या दिग्गज खेळाडूने संघाला इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.