नवे विराट-धोनी शोधण्यासाठी हा खेळाडू काश्मीरमध्ये पोहोचला

जम्मू-काश्मीरमध्ये नवीन क्रिकेटपटू शोधण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण पोहोचला.

Updated: Jul 1, 2018, 06:21 PM IST
नवे विराट-धोनी शोधण्यासाठी हा खेळाडू काश्मीरमध्ये पोहोचला title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नवीन क्रिकेटपटू शोधण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण पोहोचला. पठाण हा जम्मू काश्मीर क्रिकेट टीमचा प्रशिक्षक आणि सल्लागार आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं एका टॅलेण्ट हंट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात निवड प्रक्रियेत पठाणनं भाग घेतला. या कार्यक्रमाला उत्तर, दक्षिण आणि मध्य काश्मीरमधले वेगवेगळ्या वयाची मुलं आली होती. सध्या काश्मीरमधल्या जिल्ह्यांमध्येच ही प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या काळात जम्मूमध्येही अशाच प्रकारे टॅलेण्ट हंट घेण्यात येईल.

या टॅलेण्ट हंटमध्ये इरफान पठाण पोहोचल्यामुळे मुलांचा उत्साह आणखी वाढला. या मुलांमध्ये फक्त फिटनेसबाबत जागृकता आणि अनुभवाची कमी आहे. जर योग्य प्रशिक्षण घेतलं तर जम्मू काश्मीर क्रिकेटमध्ये नवीन उंची गाठेल. आम्ही काही योजना बनवल्या आहेत, अशी प्रतिक्रिया इरफान पठाणनं दिली.

दोनच दिवसांपूर्वी इरफाननं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. काश्मीरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून १०० मुलांची निवड करण्यात आल्याची माहिती इरफाननं इन्स्टाग्रामवरून दिली.

चार महिन्यांपूर्वी इरफान पठाण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचा सल्लागार आणि प्रशिक्षक झाला. यानंतर लगेचच इरफान काश्मीरला गेला होता. तिकडे जाऊन त्यानं स्टेडियममध्ये सराव करणाऱ्या नवोदित खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. फक्त मेहनत आणि खेळामध्ये सुधारणा केल्यावरच तुमची भारतीय टीममध्ये निवड होईल, असं इरफाननं या मुलांना सांगितलं.

इरफान पठाण भारताकडून २९ टेस्ट, १२० वनडे आणि २४ टी-२० खेळला आहे. २००८ साली पठाण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये शेवटची टेस्ट खेळला होता. तर २०१२ साली श्रीलंकेविरुद्ध तो शेवटची वनडे खेळला.