मुंबई : आयपीएलचा (IPL) चौदावा हंगाम संपला आहे आणि क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत त्या आयपीएल 2022 साठी होणाऱ्या खेळाडूंच्या मेगा ऑक्शनवर (IPL Mega Auction). मेगा ऑक्शन मध्ये अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनेक मोठे खेळाडू ऑक्शनसाठी उपलब्ध होणार असल्याचं बोललं जात आहे.
यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhavan). दिल्ली कॅपिटल्स शिखर धवनला रिटेन करणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिखर धवन ऑक्शनसाठी उपलब्ध असणार आहे.
IPL 2022 साठी दिल्लीची रणनिती
सर्व जुने संघ 4 जुन्या खेळाडूंना कायम ठेवू शकतात. अशाl दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) कायम ठेवण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीने दमदार कामगिरी केली होती. शिवाय तो यष्टिरक्षक आणि फलंदाज आहे, आपल्या खेळीने तो कधीही सामन्याचं चित्र पलटवू शकतो. दुसऱ्या क्रमांकावर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आहे. तिसऱ्या खेळाडूसाठी दिल्ली शिमरॉन हेटमायरचा (Shimron Hetmyer) विचार करु शकतं. अशा स्थितीत शिखर धवनला कुठेच संधी दिसत नाहीए.
शिखरचा आयपीएलमध्ये जबरदस्त रेकॉर्ड
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याआधी शिखर धवन आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून खेळला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये शिखर धवनने 192 सामन्यात 5748 धावा केल्या आहेत. त्याचा आयपीएलमधला रेकॉर्ड पाहता, IPL मेगा लिलावात शिखर धवनला 3 संघ टार्गेट करू शकतात.
1. अहमदाबाद
आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद संघाचा नव्याने समावेश झाला आहे. सीव्हीसी कॅपिटलने (CVC Capital) अहमदाबाद संघाची मालकी 5166 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. आयपीएलमधली संघासाठीची ही दुसरी सर्वोच्च बोली आहे. या संघाचं होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) असेल. अहमदाबादच्या संघाला शिखर धवनसारखा अनुभवी आणि धडाकेबाज फलंदाजाची निवड करायला नक्कीच आवडेल. संघाला झंझावाती सुरुवात करुन देणाऱ्या खेळाडूसाठी अहमदाबाद बोली लावू शकतात.
2. लखनऊ
आरपी-एसजी ग्रुपने (RP-SG Group) लखनऊची (Lucknow) फ्रँचायझी 7090 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या कंपनीने आयपीएलच्या नवीन संघांसाठी सर्वात मोठी बोली लावली. या संघाचं होम ग्राउंड भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium)असेल. संघमालकांच्या नजरा नक्कीच शिखर धवनवर असतील. शिखर धवन उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच संघाचं नेतृत्वही करु शकतो.
3. पंजाब किंग्स
पंजाब किंग्स (Punjab Kings) 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. पण आतापर्यंत त्यांना एकदाही विजेतेपद पटकावतं आलेलं नाही. अशा परिस्थितीत, या फ्रँचायझीचे मालक संघात अशा काही खेळाडूंचा प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील जेणेकरुन ते ट्रॉफीवर जिंकू देऊ शकतील. त्यामुळे साहजिकच शिखर धवन त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.