IPL Mega Auction 2025: इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) 2025 आधी मेगा ऑक्शन म्हणजेच महालिलाव होणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे. या लिलावामध्ये यापूर्वी कधीही लिलावामध्ये न पाहिलेले खेळाडू पाहायला मिळतील अशी दाट शक्यता आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच संघात खेळणारे अनेक दिग्गज क्रिकेटपटू यंदा संघ बदलतील असं म्हटलं जात आहे. सध्याच्या संघापासून काडीमोड घेत नव्या संघाच्या शोधत असलेल्या मोठ्या नावांमध्ये रोहित शर्माचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
2023 च्या मध्यानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनामधील मतभेद वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. रोहितला कर्णधार पदावरुन काढून त्याच्या जागी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय चाहत्यांबरोबरच रोहितलाही खटकल्याची क्रिकेट वर्तुळामध्ये चर्चा आहे. 2024 च्या हंगाम सुरु होण्याआधी अचानक हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळला. मात्र हार्दिकला कर्णधार म्हणून कमाल दाखवता आली नाही. मुंबईचा संघ 2024 च्या पर्वात पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी राहिला. रोहितची अशी अचानक उचलबांडी केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी तर थेट संघ मालकांकडे धोरणात्मक दूरदृष्टी नसल्याची टीकाही केली होती.
मात्र रोहित शर्माचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा आणि एकंदरितच ब्रॅण्ड व्हॅल्यू पाहिली तर रोहित लिलावामध्ये दिसणं ही फारच मोठी गोष्ट मानली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या मेगा ऑक्शनमध्ये मोठ्याप्रमाणात खेळाडूंनी सहभागी व्हावं म्हणून जास्तीत जास्त 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी संघांना देऊ शकतं असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच रोहित शर्मा 2025 चं पर्व वेगळ्याच संघाकडून खेळाची शक्यता अधिक आहे.
नक्की वाचा >> 'IPL संघाचे मालक उद्योजक असल्याने..', लिलावाआधी KL Rahul स्पष्टच बोलला; म्हणे, 'यशाचा...'
रोहित शर्माला संघात सहभागी करुन घेण्यासाठी एक संघ सर्वाधिक उत्सुक असल्याचं समजतं. या संघाचं नाव आह पंजाब किंग्ज! पंजाबच्या संघाला एकही आयपीएल जिंकता आलेलं नाही. त्यामुळे पंजाब किंग्जचे क्रिकेट ऑप्रेशन्सचे डायरेक्टर संजय बांगर यांनी रोहितला संघात घेण्यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. मात्र रोहित संघात घेण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा हा आर्थिक असेल अशी शक्यताही बांगर यांनी व्यक्त केली आहे. आमच्याकडे किती पैसा उपलब्ध आहे यावर आमचा निर्णय अवलंबून असेल असं बांगर यांनी म्हटलं आहे.
रोहितला संघात घेण्यात एकच अडचण ठरु शकते ती म्हणजे पैसा, असं बांगर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. "आमच्याकडे पैसे आहेत की नाही यावर सर्वकाही अवलंबून असेल. रोहित लिलावामध्ये आला तर मला विश्वास आहे की त्याला फार जास्त बोली मिळेल यात शंका नाही," असं बांगर यांनी आरएओ पॉडकास्ट या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
सध्या पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन आहे. शिखरने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे तो पुढील आयपीएल खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नसताना पंजाबचा संघ पुढील कर्णधार शोधत आहे. रोहित शर्माचा अनुभव पाहिला तर केवळ लिलावामध्येच नाही तर संपूर्ण आयपीएलमध्ये त्याच्या इतका उत्तम आणि दर्जेदार कर्णधार सापडणं कठीण आहे. त्यामुळे पंजाबचा संघ शक्य झाल्यास वाटेल ते करुन रोहितला संघात घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल यात शंका नाही.
रोहित सध्या 37 वर्षाचा असून त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतीच झालेली टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकत विजयाचा मोठा दुष्काळ संपवला होता.