'IPL संघाचे मालक उद्योजक असल्याने..', लिलावाआधी KL Rahul स्पष्टच बोलला; म्हणे, 'यशाचा...'

KL Rahul Loud Clear Message To Team Owners: यंदाच्या आयपीएलआधी संघांमध्ये मोठे उलथापालथ पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच के. एल. राहुलने केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 27, 2024, 11:54 AM IST
'IPL संघाचे मालक उद्योजक असल्याने..', लिलावाआधी KL Rahul स्पष्टच बोलला; म्हणे, 'यशाचा...' title=
पॉडकास्टमध्ये बोलताना केलं विधान

KL Rahul Loud Clear Message To Team Owners: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 2025 च्या पर्वासाठीचा लिलाव पुढील काही महिन्यांमध्ये होणार आहे. या पर्वामध्ये अनेक खेळाडू अगदी वेगळ्याच संघांमधून खेळताना दिसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय संघाचा सलामीवीर आणि लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) कर्णधार के. एल. राहुलचंही भविष्य यंदाच्या पर्वात ठरणार आहे. राहुलला आयपीएल 2024 मध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही त्याला अपयश आल्याचं पाहायला मिळालं. भारतीय टी-20 संघातून राहुलला वगळण्यात येणं हा त्याच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अशातच के. एल. राहुल एलएसजीचं कर्णधारपद सोडेलच पण तो थेट संघातून बाहेर पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच त्याने संघ मालकांना सूचक इशारा दिला आहे. 

कुठे बोलत होता राहुल?

नितीन कामतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना के. एल. राहुलने, आयपीएलच्या संघाचे मालक हे उद्योजक असल्याने ते प्रामुख्याने डेटावर म्हणजेच उपलब्ध माहितीवर अवलंबून राहतात. याच आधारे ते खेळाडूंना निवडतात, असं निरिक्षक राहुलने नोंदवलं. मात्र त्याचवेळी असा डेटा म्हणजे यश असं म्हणता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

डेटावर आधारित खेळाडू निवडू शकता पण...

"आयपीएलमधील संघ मालक हे उद्योग व्यवसायाची पार्श्वभूमी पाठीशी घेऊन येत असल्याने ते संशोधन करतात आणि संघ निवडतात. मात्र संघाची निवड म्हणजे यशाची हमी असं प्रत्येक सामन्यात होऊ शकत नाही. डेटावर आधारित तुम्ही सर्वोत्तम खेळाडू निवडू शकता. मात्र त्याच्यासाठी ते वर्ष धक्कादायक असेल. प्रत्येक खेळाडूला एखादा दिवस वाईट ठरु शकतो. खेळामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी यशाची हमी देऊ शकते. तुम्हाला हमखास यश मिळवून देईल असा यशाचा कोणताही फॉर्म्युला नसतो," असं के. एल. राहुल पॉडकास्टमध्ये म्हणाला.

मलकाबरोबर झालेला वाद

यंदाच्या आयपीएलदरम्यान एका सामन्यात एसएसजीचा पराभव झाल्यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका मैदानामध्येच कॅमेरासमोर के. एल. राहुलवर संतापल्याचं दिसून आलं होतं. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते. अशाप्रकारे मालकाने खेळाडूंना चारचौघात ओरडता कामा नये. खेळाडूंचा सान्मान राखला गेला पाहिजे, अशाप्रकाराचा युक्तीवाद राहुलच्या समर्थकांनी केला. तर दुसरीकडे अशा गोष्टी मैदानावर होत राहतात असं म्हणत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करावं असा सल्ला काहींनी दिला होता. नुकताच के. एल. राहुल. पुन्हा संजीव गोयंकांना भेटला होता. मात्र त्याने संघ मालकांबद्दल केलेलं हे विधान बरचं बोलकं आहे.