हैदराबाद : आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली. अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये मुंबईने शेवटच्या बॉलवर चेन्नईचा १ रनने पराभव केला. या विजयानंतर रात्री मुंबईच्या टीमने जोरदार सेलिब्रेशन केलं. मुंबई टीमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
'असली हिटमॅन से मिलाएं हिंदुस्तान को', असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि युवराज सिंग 'गली बॉय' चित्रपटाचं रॅप साँग 'असली हिप हॉप'वर नाचताना दिसत आहेत. रोहित शर्मा चित्रपटातल्या रणवीर सिंग प्रमाणे लिप्सिंग करून स्वॅग दाखवतोय. याचवेळी रोहित शर्माने युवराज सिंगचा गळा दाबला. युवराजही विजयाच्या या वातावरणात जोरदार मस्ती करण्याच्या मूडमध्ये होता.
आयपीएलच्या या मोसमात मुंबईकडून खेळताना युवराज सिंगने ४ मॅचच्या ४ इनिंगमध्ये २४.५० ची सरासरी आणि १३०.६६ च्या स्ट्राईक रेटने ९८ रन केले आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.
रोहित शर्माने याआधीच युवराज सिंगविषयी मोठा खुलासा केला होता. २००७ साली रोहित शर्मा त्याच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर गेला होता. यावेळी युवराज सिंग आपल्याशी बोलला नव्हता, असं रोहितने सांगितलं. टीम बस पकडण्यासाठी मी एक तास आधी लॉबीमध्ये पोहोचलो होतो. बस आल्यानंतर मी आत गेलो आणि एका सिटवर बसलो. तेव्हा युवराज आला आणि मला म्हणाला, 'इकडे कोण बसतं माहिती आहे का? या सीटवर मी बसतो. तू दुसऱ्या जागेवर जाऊन बस', असं युवराज म्हणाल्याची आठवण रोहितने सांगितली होती.
'युवराजसोबतचा माझा पहिला अनुभव चांगला नव्हता. यानंतर पुढच्या संपूर्ण दौऱ्यात तो माझ्याशी बोललाच नाही. युवराजला मॅन ऑफ द सीरिज मिळाल्यानंतर मी त्याला शुभेच्छा दिल्या, तेव्हा तो फक्त थँक्स एवढच बोलला. पण जेव्हा युवराजने ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारल्या, तेव्हा तो मला जेवायला बाहेर घेऊन गेला. आता आमच्यामध्ये चांगली मैत्री आहे', असं रोहित म्हणाला.
आयपीएलच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसनने ८० रनची खेळी करून चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं, पण मलिंगाने शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेऊन मुंबईला चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.