क्रिकेटमध्ये 'सिलेक्शन काऊच', क्रिकेटरचे गंभीर आरोप

'तो' बीसीसीआयशी निगडीत आहे आणि प्रत्येक महिन्याला बोर्डाकडून पगारही घेतो 

Updated: Jul 19, 2018, 01:25 PM IST
क्रिकेटमध्ये 'सिलेक्शन काऊच', क्रिकेटरचे गंभीर आरोप title=

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये अनेक 'कास्टिंग काऊच'ची प्रकरणं समोर आल्यानंतर आता वेळ आहे क्रिकेटची... आता क्रिकेटमध्येही 'सिलेक्शन काऊच'चं प्रकरण समोर येतंय.  उत्तरप्रदेशच्या निगडीत एका क्रिकेटरनं आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांचा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट मोहम्मद अकरम सैफी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. उत्तरप्रदेश स्टेट टीममधून खेळण्यासाठी आपल्याला सैफी यांनी 'कॉलगर्ल' पाठवण्यासाठी सांगितलं, असा आरोप या क्रिकेटरनं केलाय. हिंदी न्यूज चॅनल 'न्यूज वन'नं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हा दावा केलाय. यामध्ये नवोदित क्रिकेटर राहुल शर्मानं कथित रुपात सैफीवर 'सेक्स ऑफ सिलेक्शन'चा आरोप केलाय. 

न्यूज चॅनलनं यासंदर्भातील संभाषणाचा एक टेपही प्रसारीत केलाय. हा टेप कथित रुपात सैफी आणि राहुल शर्मा यांच्या संभाषणाचा आहे. यामध्ये, सैफी राहुलला दिल्लीतील एका फाईव्ह स्टर हॉटेलमध्ये एखाद्या मुलीला धाडण्यास सांगतोय. 

यासोबतच चॅनलनं काही इतर खेळाडुंच्या प्रतिक्रिया दाखवल्यात. यामध्ये इतर खेळाडुंनीही सिलेक्टर्स स्टेट टीममध्ये सहभागी करून देण्यासाठी लाच मागतात, असा आरोप केलाय. 

उल्लेखनीय म्हणजे, अकरम सैफी यूपी क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. परंतु, क्रिकेटर्सच्या मते पडद्यामागे तो महत्त्वाची भूमिका बजावतो. 

यासंबंधी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अकरम सैफी यानं सगळे आरोप फेटाळून लावलेत. आपल्याला आणि आपल्याशी निगडीत लोकांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचं सैफीनं म्हटलंय. अकरम गेल्या काही काळापासून राजीव शुक्लाचा पर्सनल असिस्टंट असल्याचं सांगण्यात येतं. सोबतच तो बीसीसीआयशी निगडीत आहे आणि प्रत्येक महिन्याला बोर्डाकडून पगारही घेतो.