IPL 2025 Auction This Will Be Costliest Player In IPL History: इंडियन प्रिमिअर लीगच्या 2025 च्या पर्वासाठीचा महालिलाव म्हणजेच मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. सर्वच्या सर्व 10 संघांनी ते कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहेत याची यादी जाहीर केली असून यांदाचे लिलाव हा फारच रंजक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामागील कारण म्हणजे एकट्याच्या जीवावर सामना फिरवू शकतात असे अनेक नामवंत खेळाडू यंदा लिलावात सहभागी झाले आहेत. असं असतानाच या खेळाडूंपैकी कोणाला सर्वाधिक बोली लागणार याबद्दल उत्सुकता आहे. अशातच भारतीय संघांचा माजी क्रिकेटपटू तसेच प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने या लिलावाबद्दल भाकित व्यक्त केलं आहे. आकाश चोप्राने एका भारतीय खेळाडूला किमान 25 कोटी रुपये लिलावात मिळू शकतात असं म्हटलं आहे.
आतापर्यंतच्या रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक रक्कम सनरायझर्स हैदराबादच्या संघाने हेन्रीच कार्ल्सनला दिली आहे. हेन्रीच कार्ल्सनने विराट कोहलीपेक्षाही मोठी झेप घेत 23 कोटी रुपयेंचा करार सनरायझर्सबरोबर केला आहे. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या खेळाडूंना मोठी रक्कम देऊन त्यांच्या संघाने रिटेन केलं आहे. विराट कोहलीला 21 कोटी मोजून बंगळुरुच्या संघाने रिटेन केलं आहे तर रोहितला रिटेन करण्यासाठी मुंबईने 16 कोटी 30 लाख रुपये मोजले आहेत. ऋतुराज गायकवाडला 18 कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केलं आहे. श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पाथिरानाला 13 कोटी देत चेन्नईकडून रिटेन करण्यात आलं आहे. सीएसकेने शुभम दुबेला 12 कोटींना रिटेन केलं आहे. रविंद्र जडेजाला रिटेन करण्यासाठी चेन्नईच्या संघाने 18 कोटी रुपये मोजले आहेत. यंदा धोनीला केवळ 4 कोटींमध्ये रिटेन करण्यात आलं आहे.
असं असतानाच आता आकाश चोप्राने रिटेनशनमधील 23 कोटींचा विक्रम या लिलावामध्ये सहभागी होणारा आणि मूळ संघाने रिटेन न केलेला एक खेळाडू मोडू शकतो असं म्हटलं आहे. आकाश चोप्राने ज्या खेळाडूचं नाव घेतलं आहे तो खेळाडू आहे दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत! आगामी लिलावात पंतसाठी 25 कोटी किंवा त्याहून अधिकची बोली लागेल असं आकाश चोप्राचं म्हणणं आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्राने, "विशेष म्हणजे या मोठ्या खेळाडूंनी स्वत:ला 2 कोटींच्या प्राइज रेंजमध्ये ठेवलं आहे. या रेंजमध्ये के. एल. राहुल, ऋषभ पंत यासारख्या खेळाडूंचा समावेश होतो. पंत हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू शकतो. आगामी हंगामासाठी त्याला सहज 25 ते 26 कोटी रुपये मिळू शकतात," असं भाकित व्यक्त केलं आहे.
नक्की पाहा >> Photos: चौथीत शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेनेच दिली 90 लाखांची Mercedes कारण...
आकाश चोप्रा एवढ्यावरच थांबला नाही तर पंतला कोण संघात स्थान देऊ शकतं याबद्दल बोलताना दोन टीमची नावंही त्याने घेतली आहेत. "माझ्या मते पंतसाठी दोन संघ एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. यापैकी एका संघाकडे 110 कोटी रुपये आहेत. तर दुसऱ्याकडे 83 कोटी रुपये आहेत," असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. सध्या तरी 110 कोटींची मनी पर्स असलेला संघ हा पंजाब किंग्जचा आहे. तर 83 कोटींची रक्कम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे आहे. "भरपूर पैसा शिल्लक असणारे हे दोन खेळाडू भिडतील तेव्हा बराच पैसा खर्च होईल," अशी शक्यताही आकाश चोप्राने व्यक्त केली आहे.
पंत हा 2016 पासून दिल्लीसाठी खेळत होता. मागील काही पर्वांपासून तो संघाचं नेतृत्व करत होता. मात्र यंदाच्या पर्वात कर्णधारपदावरुन मतभेद झाल्याने पंतनेच संघ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. आता पंतला कोण विकत घेतं हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे.