क्रिकेटमध्ये ऐतिहासिक बदल, आयपीएलमध्ये DRS ऐवजी SRS नियम वापरणार?

IPL 2024 Smart Reply System: बीसीसीआयकडून DRS पद्धत बाद केली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. डीआरएसच्या ऐवजी एसआरएस नियम लागू केला जाणार आहे. SRS नेमकं काम कसं करणार हे जाणून घेऊया. 

राजीव कासले | Updated: Mar 20, 2024, 04:13 PM IST
क्रिकेटमध्ये ऐतिहासिक बदल, आयपीएलमध्ये DRS ऐवजी SRS नियम वापरणार?  title=

IPL 2024 Smart Reply System: आयपीएलचा सतरावा हंगाम (IPL Season 17) सुरु होण्यासाठी आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरलाय. पण त्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरला जाणारा डीआरएस (DRS) नियम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बीसीसीआयकडून (BCCI) डीआरएस (Decision Review System) नियम बाद केला जाण्याची शक्यता आहे. डीआरएसऐवजी लवकरच एसआरएस (Smart Reply Systme) नियम लागू केला जाईल. डीआरएस नियमात अंपायरचा निर्णय चुकीचा वाटल्यास फलंदाज किंवा गोलंदाज तिसऱ्या अंपायरकडे दाद मागतो. निर्णय घेण्यासाठी त्याला 15 सेकंदाचा वेळ दिला जातो. पण डीआरएस नियमावरुन अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत. 

काय आहे एसआरएस नियम?
एसआरएस हा निर्णय डीआरएसच्या तुलनेत अधिक अचूक निर्णय देईल असं म्हटलं जातंय. एसआरएसचा पूर्ण अर्थ आहे 'स्मार्ट रिव्यू सिस्टम', अतिशय स्मार्ट पद्धतीने यात निर्णय घेतले जाणार आहेत. यात कोणतीही त्रुटी राहणार नाहीत. त्यामुळे याला स्मार्ट रिप्ले सिस्टम असंही म्हटले जात आहे. एसआरएस हे डीआरएसपेक्षा अनेक प्रकारे वेगळे आहे. डीआरएसबाबत अनेकदा वाद होतात, अशा परिस्थितीत एसआरएस लागू झाल्यानंतर हे वादही संपुष्टात येतील. 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होणार आहे. या स्पर्धेतून डीआरएस काढून एसआरएस सुरू केला जाऊ शकतो.

SRS कसं काम करणार?
- स्मार्ट रिप्ले सिस्टीम  नियम लागू झाल्यानंतर टीव्ही संचालकाची भूमिका संपुष्टात येईल. थर्ड अंपयार थेट दोन हॉक-आय ऑपरेटरकडून घटनेचे इनपुट घेऊन आपला निर्णय देईल.
- स्मार्ट रिप्ले सिस्टिमसाठी मैदानावर स्वतंत्रपणे एकूण 8 कॅमेरे बसवण्यात येतील. त्याद्वारे टीव्ही अंपायरला एखाद्या घटनेचं अचूक फुटेज मिळू शकणार आहे. हे फुटेज दोन हॉक-आय ऑपरेटरद्वारे टीव्ही पंचांना उपलब्ध होईल.
- SRS आल्यानंतर, स्प्लिट स्क्रीन दाखवणं शक्य होणार आहे. म्हणजे जर फिल्डरने ओव्हरथ्रो केला आणि चेंडू बाऊंड्री पार गेला तर अशा परिस्थितीत गोलंदाजाने चेंडू टाकल्यावर फलंदाजाने क्रिझ ओलांडली आहे की नाही हे स्पष्ट होईल
- या नियमानंतर जर एखादा फलंदाज स्टम्प आऊट झाला तर अंपायरना ट्राई-व्हिजन दाखवलं जाईल. म्हणजे एकाच वेळी बाजूच्या कॅमेऱ्यांव्यतिरिक्त समोरचं फुटेज दाखवण्यात येईल
- एसआरएस नियम लागू झाल्यानंतर आयपीएल 2024 मध्ये प्रत्येक सामन्यात एकूण 15 अंपायर काम करतील, जेणेकरुन कोणत्याही निर्णयात चूक होणार नाही, असा दावा केला जात आहे.