'मी 10 वर्षांपासून कर्णधार ...,' MI ची खराब कामगिरी आणि कॅप्टन्सीवर रोहित शर्माने सोडलं मौन, 'यशस्वी संघ बनवण्यासाठी...'

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला सर्व ठिकाणी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यातही चाहत्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली.   

शिवराज यादव | Updated: Apr 18, 2024, 07:41 PM IST
'मी 10 वर्षांपासून कर्णधार ...,' MI ची खराब कामगिरी आणि कॅप्टन्सीवर रोहित शर्माने सोडलं मौन, 'यशस्वी संघ बनवण्यासाठी...' title=

IPL 2024: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला अपेक्षित सुरुवात मिळाली नसून, संघाने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सने फक्त दोन सामने जिंकले असून गुणतालिकेतही तळाशी आहे. मुंबई इंडियन्स संघात काही नवे बदल करण्यात आले असल्याने यावेळी कामगिरी उंचावेल अशी आशा होती. पण ही आशा फोल ठरली असून, याचं सर्व खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) फोडलं जात आहे. याचं कारण मुंबई इंडियन्सने सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे. 

हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिलं. तर दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत नेलं होतं. त्याची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्सने त्याला ट्रेड करत पुन्हा संघात घेतलं. यासाठी त्यांनी मोठी किंमतही मोजली. यानंतर त्याच्याकडे थेट नेतृत्व सोपवण्यात आलं. मुंबई इंडियन्सने ज्याप्रकारे हार्दिकला कर्णधार करण्यासाठी रोहितला हटवलं ते मुंबईच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही. यामुळे  हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सर्व ठिकाणी चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यातही चाहत्यांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली. 

हार्दिक पांड्याला आपल्या कामगिरीतून टीकेला उत्तर देण्याची संधी होती. पण मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमुळे या टीकेत भर टाकली आहे. आतापर्यंत झालेल्या 6 सामन्यांपैकी मुंबई फक्त 2 जिंकली आहे. दरम्यान मुंबईच्या या खराब कामगिरीवर रोहित शर्माने भाष्य केलं आहे. तसंच कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाबद्दलही सांगितलं. 

"इतक्या वर्षात, मुंबईची ही आता पद्धतच झाली आहे. आम्ही धीम्या गतीने सुरुवात करतो आणि नंतर गोष्टी बदलू लागतात. मला वाटतं जेव्हा तुमच्याकडे संघात नवीन खेळाडू असतात तेव्हा त्याचाही फरक पडतो. कारण गेल्या 10 वर्षांपासून एकच कर्णधार होता. काही वर्षांपासून प्रशिक्षक बदलले, पण कर्णधार मात्र तोच होता,” असं रोहितने सांगितलं. 

"मी प्रत्यक्षात काही विचार प्रक्रियेसह गेलो होतो आणि जे खेळाडू येतील त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. मला त्यांना माझ्या विचार प्रक्रियेत सामील करून घ्यायचं होतं कारण मला आयपीएल कशाप्रकारे चालतं आणि एक यशस्वी संघ बनण्यासाठी काय आवश्यक आहे याची मला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येकाला तिथे आणणं आणि त्यांना सवय नाही अशा गोष्टी करायला लावणं यात थोडा वेळ लागतो," असं रोहित म्हणाला. 

त्याने उदाहरण देत सांगितलं की, "बरेच क्रिकेटपटू, परदेशी खेळाडू, स्थानिक खेळाडू संघात आले आहेत. मला वानखेडेच्या मैदानाची चांगली माहिती आहे. कारण मी तिथे खेळलो आहे. मी तिथे मोठा झालो आहे, म्हणून मला माहित आहे की तिथे कोणत्या गोष्टी काम करतात आणि तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे."

रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2022 अशा 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकवून दिली आहे. रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीसह आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.