IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची तीन शब्दांची पोस्ट, म्हणाला...

IPL 2024: आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. या विजयानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) तीन शब्दांची पोस्ट शेअर केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 8, 2024, 01:04 PM IST
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची तीन शब्दांची पोस्ट, म्हणाला... title=

IPL 2024: आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अखेर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. या विजयानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) तीन शब्दांची पोस्ट शेअर केली आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव करत गुणतालिकेत अखेर आपल्या नावे पॉईंट्स मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरुन काढत हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यातच मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले असल्याने या वादात भर पडली होती. पण मुंबईने अखेर पहिला विजय मिळवला असल्याने चाहते थोडेसे विसावले आहेत. 

मुंबईने प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीसमोर 235 धावांचा डोंगर उभा केला होता. रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत 39 धावा ठोकत मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. दिल्लीकडून पृथ्वी शॉने 40 चेंडूत 66 धावांची चांगली खेळी केली. पण दिल्लीला 20 षटकात 205 धावाच करता आल्या. पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने 'Off The Mark' असं लिहिलं आहे. 

दरम्यान हा सामना हार्दिक पांड्याला एक वेगळा दिलासा देणाराही ठरला. आतापर्यंत हार्दिक पांड्याला मैदानात मुंबईच्या चाहत्यांकडून शेरेबाजीचा सामना करावा लागत होता. पण दिल्लीविरोधातील वानखेडे मैदानात सामन्यात त्याच्याविरोधात फारसी शेरेबाजी झाली नाही. या सामन्यासाठी विविध सेवाभावा संस्थांकडून जवळपास 18 हजार मुलं स्टेडिअममध्ये उपस्थित होती. त्यामुळे ही मुलं मुंबईला पाठिंबा देताना दिसली. 

याआधी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी, हैदराबादमधील राजीव गांधी आणि मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबईचे सामने पार पडले आहेत. या तिन्ही सामन्यात हार्दिक पांड्याविरोधात मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याविरोधात शेरेबाजी केली होती. हार्दिक पांड्या फक्त मैदानात नाही तर मैदानाबाहेरही सोशल मीडियावर चाहत्यांच्या निशाण्यावर होता. 

रविवारी दिल्लीविरोधातील सामन्याआधी बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रेक्षकांना हार्दिकविरोधात शेरेबाजी न करण्याचा सल्ला दिला होता. जर त्या खेळाडूला कर्णधार करण्यासाठी पुन्हा संघात आणलं असेल तर ती त्याची चूक नाही असं गांगुली म्हणाला. "मला वाटत नाही की त्यांनी हार्दिक पांड्याविरोधात घोषणाबाजी, शेरेबाजी करावी. हे योग्य नाही," असं सौरव गांगुली म्हणाला.

"फ्रँचायझीने कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती केली आहे. कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं असेल ती हार्दिकची चूक नाही. आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे. साहजिकच, रोहित शर्मची एक वेगळी उंची आहे. फ्रँचायझीसाठी तसंच भारतासाठी कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याची कामगिरी वेगळ्या पातळीवर राहिली आहे,” असं गांगुलीने सांगितलं.