आयपीएल 2024 साठी सर्व संघ आता तयारीला लागले आहेत. खेळाडूंना रिटेन करण्याची मुदत संपल्यानंतर आता चित्र स्पष्ट झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा पृथ्वी शॉला संघात स्थान दिलं आहे. दिल्लीच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये फारसा यशस्वी झालेला नाही. पण तरीही त्याला रिटेन करणं अनेकांना आश्चर्यकारक वाटलं असून, यामध्ये समालोचक हर्षा भोगले यांचाही समावेश आहे. हर्षा भोगले यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं असून, पृथ्वी शॉला हाताळणं फार कठीण असल्याचं म्हटलं आहे.
पृथ्वी शॉ भाग्यशाली आहे, कारण दिल्ली संघाने त्याला रिटेन केलं आहे. कारण त्याने आपण हाताळण्यास फार कठीण आहोत अशी आपली एक प्रतिमा तयार केली आहे असं हर्षा भोगले म्हणाले आहेत. तसंच आपली ही प्रतिमा बदलण्यासाठी तो मेहनत घेईल अशी आशा व्यक्त केली आहे. तो एक स्फोटक फलंदाज असल्याचंही ते म्हणाले आहेत.
"दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलं असल्याने पृथ्वी शॉ थोडा भाग्यशाली ठरला आहे. कारण त्याने आपण हाताळण्यास फार कठीण असल्याची प्रतिमा तयार केली आहे. तो एक स्फोटक फलंदाज असल्याने आपली ही प्रतिमा बदलण्यासाठी तो मेहनत घेईल अशी आशा आहे," असं हर्षा भोगले म्हणाले आहेत.
पृथ्वी शॉ काऊंटी क्रिकेट खेळताना जखमी झाला असून, गुडघ्याला दुखापत झाली आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि संचालक सौरव गांगुली यांचा पृथ्वी शॉच्या क्षमतांवर विश्वास आहे. यामुळेच जखमी असतानाही त्यांनी पृथ्वी शॉला संघात जागा दिली आहे. आयपीएल 2024 आधी पृथ्वी शॉ फिट होईल अशी आशा आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने सरफराज खान आणि मनिष पांडे यांना आधीच रिलीज केलं आहे.
Prithvi Shaw might be a bit lucky to be retained by @DelhiCapitals because he has, unfortunately, acquired the reputation of being difficult to handle. I hope he works hard towards changing that perception because on song, he is one of the most destructive power play batters in…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 26, 2023
दिल्लीने जर पृथ्वी शॉला रिटेन केलं नसतं तर कदाचित त्याला कोणत्याच संघाने विकत घेतलं नसतं. दरम्यान अशा स्थितीत पृथ्वीसाठी करो या मरो स्थिती असल्याचं अनिल कुंबळे म्हणाला आहे.
“त्याला हे समजलं पाहिजे की त्याच्यासोबतचे खेळाडू फार पुढे गेले आहेत. त्याच्यासोबत खेळलेला शुभमन गिल आता भारताचा सर्वोत्तम सलामीवीर बनला आहे. त्याच्याकडे भारतीय संघाचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. त्यामानाने पृथ्वी खूप मागे राहिला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा हंगाम एकतर करिअर घडवणारा असेल किंवा करिअरचा शेवट असेल,” असं अनिल कुंबळेनी म्हटलं आहे.