मुलगा IPL मध्ये, वडील आजही करतायत सुरक्षारक्षकाची नोकरी; शुभमन गिलने घेतली भेट 'तुमच्या कठोर मेहनतीमुळे...'

Shubman Gill meets Robin Minz Father:  रॉबिन मिंज (Robin Minz ) आयपीएलमध्ये (IPL) पोहोचलेला पहिला आदिवासी खेळाडू ठरला आहे. गुजरातने (Gujarat Titans) रॉबिनला संघात स्थान दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 29, 2024, 02:52 PM IST
मुलगा IPL मध्ये, वडील आजही करतायत सुरक्षारक्षकाची नोकरी; शुभमन गिलने घेतली भेट 'तुमच्या कठोर मेहनतीमुळे...'  title=

Shubman Gill meets Robin Minz Father:  22 मार्चपासून आयपीएल हंगामाला (IPL 14) सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने आयपीएल हंगाम सुरु होण्याची वाट पाहत आहेत. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणाही करण्यात आली आहे. पहिला सामना बंगळुरु विरुद्ध गतविजेता संघ चेन्नई यांच्यात होणार आहे. दरम्यान अनेक संघांनी  आयपीएलसाठी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने आपल्या संघातील खेळाडूच्या वडिलांची भेट घेतली आहे. या खेळाडूचे वडील विमानतळावर सुरक्षारक्षकाचं काम करतात. 

रॉबिन मिंज (Robin Minz ) आयपीएलमध्ये पोहोचलेला पहिला आदिवासी खेळाडू ठरला आहे. रॉबिन मिंजला गुजरात टायटन्सने खरेदी करत आपल्या संघात स्थान दिलं आहे. गुजरातने रॉबिन मिंजला 3 कोटी 60 लाखात खरेदी केलं आहे. 

रॉबिन मिंजचे वडील फ्रान्सिस जेवियर मिंज रांची विमानतळावर सुरक्षारक्षकाचं काम करतात. गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने रॉबिन मिंजच्या वडिलांची भेट घेतली आहे. व्हिडीओत शुभमन गिल आपुलकीने त्यांची भेट घेताना दिसत आहे. यावेळी रॉबिन मिंजचे वडील शुभमनशी संवाद साधत आहेत. 

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळण्यासाठी रांचीला गेली होती. यावेळी शुभमन गिलने रॉबिन मिंजच्या वडिलांची भेट घेतली होती. यावेळी दोघांनी विमानतळावर बराच वेळ चर्चा केली. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ क्रिकेटचाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "जेव्हा कर्णधार शुभमन गिल रॉबिन मिंजच्या वडिलांना भेटला, विनम्रतेचे उदाहरण". चाहत्यांनी शुभमन गिलच्या कृतीचं कौतुक केलं आहे. शुभमन गिलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "रॉबिन मिंजच्या वडिलांना भेटून मला सन्मानपूर्वक वाटत आहे. तुमचा प्रवास आणि कठोर मेहनत प्रेरणादायी आहे. मी आयपीएलमध्ये तुमची भेट घेण्याची वाट पाहत आहे".

'रांचीचा गेल' नावाने रॉबिन मिंज प्रसिद्ध

रॉबिन मिंज झारखंडकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याला 'रांचीचा गेल' नावाने ओळखलं जातं. रॉबिन मिंजने विकेटकिपर फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. 2022 मध्ये ओडिशामधील एका टी-20 मालिकेत त्याने 35 चेंडूत 73 धावा ठोकल्या होत्या. या खेळीने त्याला ओळख मिळवून दिली होती. रॉबिनच्या याच कामगिरीने प्रभावित होऊन गतवर्षी आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सने त्याला ट्रायलसाठी बोलावलं होतं.

22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात

22 मार्चपासून आयपीएल हंगामाला सुरुवात होणार आहे. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल खेळणार नाही आहे. तर दुसरीकडे कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई संघात सामील झाला आहे. यामुळे नवख्या शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. हार्दिकने 2022 मध्ये गुजरातला आयपीएलचा खिताब मिळवून दिला होता. तर गतवर्षी उपविजेता संघ ठरला होता. त्यामुळे यावेळी शुभमन गिल ही यशस्वी कामगिरी पुढे कायम ठेवेल अशी आशा व्यक्त होत आहे. 

कसा आहे गुजरातचा संघ?

शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नलकंडे, उमेश यादव, अजमतुल्ला उमरजई, विजय शंकर, जयंत यादव, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रॉबिन सुतार, मानव सुथार. रॉबिन मिंझ, मोहम्मद शमी, नूर अहमद, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, साई किशोर, राशीद खान