IPL 2024 : आयपीएल 2024 साठी सर्व दहा संघांबरोबरच करोडो भारतीय क्रिकेट फॅन्सही सज्ज झाले आहेत. आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. पहिल्या टप्प्यात 17 दिवसात 21 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक संघ चार सामने खेळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तारखा घोषित झाल्या असून आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाणार आहे. येत्या 22 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्याने आयपीएलला सुरुवात होईल.
आयपीएलचा सतरावा हंगाम
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा हा सतरावा हंगाम आहे. बरोबर 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये आयपीएलला सुरुवात झाली होती. अल्पावधीत आयपीएल ही जगातील सर्वात जास्त पाहिली जाणारी क्रिकेट लीग ठरलीय. देशविदेशातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. तर अनेक युवा स्टारही आयपीएलने दिलेत यातले काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकलेत. तर काही खेळाडू काळाच्या ओघात विस्मरणात गेले. असाच एक खेळाडू आयपीएलच्या इतिहासात आजही आपल्या विक्रमासाठी ओळखला जातो. या खेळाडूच्या नावावर आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिल्या शतकाचा विक्रम जमा आहे.
आयपीएलमधलं पहिलं शतक
पहिल हे नेहमीच खास असतं. पहिला विजय, पहिलं शतक, पहिली विकेटची क्रिकेटच्या इतिहासात नोंद होते. आयपीएल इतिहासातील पहिलं शतक बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्समधल्या फलंदाजांच्या नावावर आहे. या खेळाडूचं नाव आहे ब्रँडन मॅक्युलम Brendon McCullum. आयपीएल 2008 चा हंगाम ब्रँडन मॅक्युलनने आपल्या तुफान फलंदाजीने गाजवला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध बँडन मॅक्युलमने अवघ्या 73 चेंडूत 158 धावांची खेळी केली होती. यात त्याने तब्बल 10 चौकार आणि 13 षटकारांची बरसात केली होती.
केकेआरचा बलाढ्य विजय
ब्रँडन मॅक्युलमच्या या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पहिली फलंदाजी करणाऱ्या केकेआरने 222 धावांचा डोंगर उभा केला. होता. यात एकट्या मॅक्युलमचा 158 धावांचा वाटा होता. विजयाचा पाठलाग करताना आरबीसीचा संपूर्ण संघ अवघ्या 82 धावांवर ऑलआऊट झाला. केकेआरने तब्बल 140 धावांनी बलाढ्य विजय मिळवला. केकेआरकडून वेगवान गोलंदाज अजित आगरकरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या होत्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक
आयपीएलमध्ये पहिलं शतक रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध असलंत तरी आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा मान आरसीबीच्याच फलंदाजाच्या नावावर आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं केली आहेत. विराटच्या नावावर तब्बल 7 शतकं जमा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेलचं नाव असून त्याने 6 तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोस बटलने 5 शतकं केली आहेत.