Jadeja Dhoni Controversy: जडेजा विरुद्ध धोनी वादात जडेजाच्या पत्नीने घेतली उडी! पतीला सल्ला देत म्हणाली, "तुम्ही तुमचा..."

IPL 2023 Ravindra Jadeja MS Dhoni Controversy: चेन्नईचा संघ आज क्वालिफायर-1 चा सामना खेळणार असून त्यांच्यासमोर गुजरात टायटन्ससारख्या दमदार संघाचं आव्हान असतानाच संघातील अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 23, 2023, 10:45 AM IST
Jadeja Dhoni Controversy: जडेजा विरुद्ध धोनी वादात जडेजाच्या पत्नीने घेतली उडी! पतीला सल्ला देत म्हणाली, "तुम्ही तुमचा..." title=
Ravindra Jadeja MS Dhoni Controversy

IPL 2023 Ravindra Jadeja MS Dhoni Controversy: आयपीएल 2023 मधील पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सदरम्यान (Chennai Super Kings V Gujarat Titans) हा सामना खेळवला जाणार असून अंतिम सामन्यातील पहिला संघ या सामन्यानंतर निश्चित होईल. एकीकडे या महत्त्वाच्या सामन्याची चर्चा असतानाच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या संघात फूट पडलीय की काय अशी चर्चा जोर धरु लागली आहे. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीमधील कथित वादाने (Ravindra Jadeja MS Dhoni Controversy) पुन्हा डोकं वर काढलं आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये या दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानात बाचाबाची झाली आणि त्यानंतर जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. याच पोस्टमुळे दोघांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.

जडेजाच्या पत्नीची वादात उडी

जडेजा आणि धोनीमध्ये खरोखरच वाद आहे का असा प्रश्न आता चेन्नईच्या चाहत्यांनाही पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर या दोघांमधील वादाची चर्चा सुरु झाली. या व्हिडीओमध्ये धोनी रागवलेल्या हावभावासहीत अगदी जडेजाच्या छातीवर हात मारत त्याला काहीतरी समजावत असताना दिसत आहे. या व्हिडीओची चर्चा असताना दुसरीकडे रविंद्र जडेजानेही एक ट्वीट केलं. या ट्वीटवरुन वादाचे संकेत मिळालेले असतानाच जडेजाची पत्नी आणि भाजपाच्या गुजरातमधील आमदार रीवाबा जडेजानेही या वादात उडी घेतली आहे. 

नेमकं घडलं काय?

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई आणि दिल्लीदरम्यान साखळी फेरीमधील 67 वा सामना खेळवला गेला. हा सामना चेन्नईने मोठ्या फरकाने जिंकून प्लेऑफ्समधील आपलं स्थान निश्चित केलं. या सामन्यामध्ये जडेजाला नावाला जासेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 4 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 50 हून अधिक धावा दिल्या. याच विषयावरुन सामना संपल्यानंतर मैदानात धोनी आणि जडेजामध्ये बाचाबाची झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

जडेजाचं सूचक ट्वीट

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने केलेल्या एका ट्वीटमुळे या वादाच्या चर्चेला अधिक खतपाणी मिळालं. "कर्म हे परत फिरुन येत अगदी आज नाही तर उद्या. पण इतकं नक्की की कर्म परत येतं," अशा ओळी असलेला फोटो जडेजाने ट्वीट केला आहे. याच फोटोला रिट्वीट करत आता रीवाबाने, "तुम्ही तुमचा मार्ग निवडायला हवा," असं म्हटलं आहे.

जडेजाने डिलीट केलेल्या सर्व पोस्ट

मागील 2 पर्वांपासून जडेजा आणि धोनीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या आहेत. मागील वर्षी जडेजाने सीएसचं नेतृत्व केलं होतं. काही सामन्यामध्ये सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्याने जडेजाला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर जडेजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सीएसकेसंदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांनी मात्र जडेजाने धोनीबरोबरचा फोटो पोस्ट करत सर्वकाही ठिक असल्याचे संकेत देत आपण चेन्नईकडूनच 2023 चं आयपीएलच पर्व खेळणार हे अप्रत्यक्षपणे जाहीर केलं होतं.