IPL 2023 Points Table Playoffs Scenario: इंडियन प्रमिअर लिग म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील (IPL 2023) 62 व्या सामन्यामध्ये प्ले ऑफमधील (Playoffs Scenario) पहिला संघ आज निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे रविवारी दिल्ली कॅपीटल्सचा संघ हा प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणार पहिला संघ ठरला आहे. आज आयपीएलमधील सामना गुजरात जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये (GT vs SHR) खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास गुजरातचा संघ हा प्ले ऑफमध्ये जणारा पाहिला संघ ठरेल. तर हैदराबाद पराभूत झाल्यास त्यांच्या प्ले ऑफच्या आशा धूसर होतील.
मागील सामन्यामध्ये गुजरातचा मुंबई इंडियन्सने 27 धावांनी पराभव केला होता. गुजरातच्या गोलंदाजांनी केलेली सुमार कामगिरी, सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीमुळे मुंबईला 200 हून अधिक धावा करता आल्या. त्यानंतर गुजरातची आघाडीच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. तळाच्या फलंदाजांनी दमदार झुंज देत गुजरातची धावसंख्या 190 च्या वर नेल्याने नेट रन रेटमध्ये गुजरातला पराभवानंतरही मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच आजचा सामना खिशात घालून गुजरातला थेट प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याची सुवर्णसंधी आहे.
रविवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट राडयर्सच्या सामन्याने विजय मिळवून कोलकात्याने प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या विजयासहीत कोलकात्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी उडी मारली आहे. कोलकात्याच्या विजयामुळे हैदराबादच्या संघाची घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा सामना हैदराबादसाठी करो या मरो असा असणार आहे. आजचा सामना पराभूत झाल्यास हैदराबादही प्ले ऑफच्या शर्यतीमधून जवळजवळ बाद झाल्यात जमा होईल.
दरम्यान, रविवारचा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्जला पॉइण्ट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची संधी होती. मात्र हा सामना कोलकात्याने 6 विकेट्स राखून जिंकल्याने चेन्नईला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. चेन्नईच्या नावावर 15 गुण आहेत.
पॉइण्ट्स टेबलमध्ये गुजरात 12 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसहीत पहिल्या स्थानी आहे. त्या खालोखाल 13 पैकी 7 सामन्यांमधील विजयासहीत 15 गुणांबरोबर चेन्नई दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सचा संघ 7 विजयांसहीत 14 गुणांबरोबर टॉप 3 मध्ये आहे. चौथ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ असून त्यांनी 12 पैकी 6 सामने जिंकलेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब सुपर किंग्ज या संघांनी प्रत्येकी 6 सामने जिंकलेत. मात्र नेट रन रेटच्या जोरावर हे संघ अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी आङेत. हैदराबादचा संघ 11 पैकी 4 सामन्यांमधील विजयासहीत 9 व्या स्थानी आहे. तर दिल्ली प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली असून त्यांना 12 पैकी केवळ 4 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.
गुजरात विरुद्ध हैदराबादचा सामना आज सायंकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आण जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.