IPL 2023 Points Table: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून काही नवख्या खेळाडूंनी त्यांची छाप सोडत निवड समितीच्याही नजरा वळवल्या. यंदाचं आयपीएल परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय नवोदितांनी गाजवल्याचं किमान आतापर्यंत तरी पाहायला मिळत आहे. त्यातच सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन याला अखेर मैदानात खेळण्याची संधी मिळाल्यामुळं क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे सर्वकाही सुरु असताना तिथं गुणतालिकेमध्ये अर्थात Points Table मध्ये कोणत्या संघांमध्ये चुरस सुरु आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरत आहे. कारण, इथंही माहीच्या चेन्नई एक्स्प्रेसला वेग मिळाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात माहीच्या संघानं रॉयल चॅलेन्सजर्स बंगळुरूला 8 धावांनी पराभूत केलं. ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डूप्लेसिस या जोडीनं संघाच्या धावसंख्येत 126 धावांची भर टाकत बंगळुरूच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. पण, त्यानंतर मात्र संघाचा डाव गडबडला आणि चेन्नईच्या संघानं सहजपणे बंगळुरूवर मात केली. या विजयासह चेन्नईच्या संघानं Points Table मध्ये थेट तिसऱ्या स्थानावर उसळी मारली, तर बंगळुरूच्या संघाला सातव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं. सध्या या यादीत राजस्थानचा संघ अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे.
आयपीएलमधील सामन्यांची आतापर्यंतची आकडेवारी आणि खेळाडूंची कामगिरी पाहता सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये फाफ डूप्लेसिस आघाडीवर असून, त्यानं पाच सामन्यांमध्ये 259 धावा केल्या आहेत, त्यामुळं सध्या ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. तर, विराट या यादीत सहाव्या स्थानावर असून, त्यानं 220 धावा केल्या आहेत.
पर्पल कॅपविषयी सांगावं तर, राजस्थान रॉयल्स या संघातील फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याच्याकडे ही कॅप असून, त्यानं आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 20 गडी बाद केले आहेत. त्याच्यामागोमाग या यादीत मार्क वूड (11 गडी), राशिद खान (11 गडी), मोहम्मद शमी (10 गडी) या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.