IPL 2023: धोनीने मैदानावरच घेतला तुषार देशपांडेचा क्लास, सामन्यानंतरचा VIDEO व्हायरल

IPL 2023: लखनऊ सुपरजायंट्सविरोधातील (Lucknow Super Giants) सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) गोलंदाजांनी नो-बॉल टाकल्याने नाराजी जाहीर केली आहे. धोनीने संघाला इशारा दिला असून, जर यानंतरही गोलंदाजांमध्ये सुधारणा झाली नाही तर कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Apr 4, 2023, 04:20 PM IST
IPL 2023: धोनीने मैदानावरच घेतला तुषार देशपांडेचा क्लास, सामन्यानंतरचा VIDEO व्हायरल title=

MS Dhoni Confronts Tushar Deshpande: आयपीएलमध्ये चेन्नईने (Chennai Super Kings) लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) 12 धावांनी पराभव केला असून आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने 12 धावांनी चेन्नईचा पराभव केला. दरम्यान चेन्नईने सामना जिंकला असला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) मात्र गोलंदाजांवर नाराज आहे. गोलंदाजांनी अतिरिक्त धावा दिल्याने धोनीने संघाला इशाराच दिला आहे. जर गोलंदाजांमध्ये सुधारणा झाली नाही, तर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं धोनीने स्पष्ट केलं आहे. त्यातच धोनी मैदानात गोलंदाज तुषार देशपांडेचा क्लास घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

तुषार देशपांडेने गोलंदाजी करताना नो-बॉल आणि वाईडच्या माध्यमातून अनेक अतिरिक्त धावा दिल्या. दरम्यान सामन्यानंतरचा मैदानातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महेंद्रसिंग धोनी 3 नो-बॉल आणि 4 वाईड टाकणाऱ्या तुषार देशपांडेशी बोलत असताना दिसत आहे. यावेळी धोनी त्याला नेमक्या कशाप्रकारे गोलंदाजी केल्यास नो-बॉल पडणार नाही याबद्दल सांगताना दिसत आहे. 

चेन्नईने 12 धावांनी सामना जिंकला आहे, मात्र जर गोलंदाजांनी अतिरिक्त धावा दिल्या नसत्या तर हा विजय आणखी मोठा असता. त्यामुळेच सामन्यानंतर बोलताना धोनीने जर गोलंदाजांमध्ये सुधारणा झाली नाही, तर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचा इशारा दिला आहे. "गोलंदाजांनी नो-बॉल आणि वाईड बॉल न टाकणं अपेक्षित आहे. गोलंदाज फार अतिरिक्त धावा देत असून ते थांबवलं पाहिजे. अन्यथा त्यांना नवी कर्णधाराच्या नेतृत्वात खेळावं लागेल," असं धोनीने सांगितलं आहे.

दरम्यान धोनीने चेपॉकच्या मैदानात इतक्या धावा करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. "जास्त धावसंख्या उभारणारा हा चांगला खेळ झाला. आम्ही सर्वजण विकेट कशी असेल याचा विचार करत होतो. आम्हाला याबाबत शंका होती. या खेळात फार धावा झाल्या. मला वाटतं हा अत्यंत परफेक्ट गेम होता. मला वाटलं होतं की, खेळपट्टी थोडी धीम्या गतीची असेल. या खेळपट्टीवर जास्त धावा होणार नाहीत. पुढील सामन्यात नेमकं काय चित्र असेल ते पाहावं लागेल," असं धोनीने म्हटलं आहे. दरम्यान, तुषार देशपांडेनेही आपण चांगली खेळी करु शकलो नसल्याचं मान्य केलं आहे.