MI vs DC: मुंबई-दिल्ली आज आमनेसामने, कोणता संघ उघडणार विजयाचं खातं? पाहा Playing XI

IPL 2023 MI vs DC : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ पॉईंटटेबलमध्ये तळाला आहेत.

Updated: Apr 11, 2023, 03:54 PM IST
MI vs DC: मुंबई-दिल्ली आज आमनेसामने, कोणता संघ उघडणार विजयाचं खातं? पाहा Playing XI title=

IPL 2023 MI vs DC, Predicted Playing XI : नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी अवस्था आयपीएलमधल्या (IPL 2023) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची झाली आहे. संघात स्टार खेळाडू असूनही दोन्ही संघांना अद्याप विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवाला सामोरं जावं लागलं असून पॉईंटटेबलमध्ये (IPL Point Table) नवव्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीची अवस्था यापेक्षाही वाईट आहे. डेव्हिड वॉर्नरच्या (Devid Warner) दिल्ली कॅपिटल्सने पराभवाचा हॅटट्रीक केली असून पॉईंटटेबलमध्ये तळाला आहे. आज घरच्या मैदानावर खेळणारा दिल्ली संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असेल. 

मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवणार?
आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. आयपीएलच्या गेल्या काही हंगामात पराभवाने सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातही परंपरा कायम ठेवली आहे. आधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि नंतर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मुंबईला पराभवाचा धक्का दिला. मुंबई इंडियन्समध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे. पण विजयी कामगिरी करण्यात त्यांना यश आलेलं नाही. स्वत: कर्णधार रोहित शर्माला सूर सापडलेला नाही. तर आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कॅमरुन ग्रीनच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. 

गोलंदाजही ठरतायत फ्लॉप
मुंबईच्या गोलंदाजीतही अद्याप धार दिसलेली नाही. जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) वेग मुंबईला वाचवू शकलेला नाही. तर जेसन बेहरेनडोर्फ आणि युवा वेगवान गोलंदाज अरशद खानही आपली छाप उमटवू शकलेले नाहीत जोफ्रा आर्चर गेल्या सामन्यात खेळू शकला नाही, आणि आजच्या सामन्यातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. 

दिल्लीलाही सूर गवसेना
दिल्ली कॅपिटल्सची अवस्था तर मुंबई इंडियन्सपेक्षीही वाईट आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे सातत्याने स्वस्तात पॅव्हिलिअनमध्ये परतत आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नराच स्ट्र्र्राईक रेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर परदेशी फलंदाज रिले रिसॉ आणि रोवमेन पॉवेल अजून आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकलेले नाहीत. दिल्लीचा प्रमुख खेळाडू मिचेल मार्श या सामन्यातही खेळणार नाही. 

खलील-नॉर्कियाची गोलंदाजी फ्लॉप
मुंबई इंडियन्सप्रमाणेच दिल्ली कॅपटिल्सचा गोलंदाजीतही अद्याप दम दिसत नाहीए. खलील अहमदने गेल्या सामन्यात 2 षटकात तब्बल 31 धावा दिल्या. तर एनरिक नॉर्कियाने एकही विकेट न घेता 4 षटकात 44 धावांचा खैरात वाटली. दिग्गज कुलदीप यादव आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीची जादूही कमी झाली आहे. 

मुंबई इंडियन्स संभाव्य Playing XI
रोहित शर्मा, ईशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अरशद खान, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, ऋतिक शौकीन, पीयूष चावला

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य Playing XI 
पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, रिले रोसॉ, ललित यादव, अक्षर पटेल, रोवमेन पॉवेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, मुकेश कुमार, खलील अहमद