Ravi Shastri on Virat Kohli Records: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या फॉर्मात परतला आहे. दुसरीकडे आयपीएच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. विराटच्या या विक्रमाबाबतच भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी महत्त्वाचं विधान केले आहे. भारतीय संघातील सध्याच्या घडीचा महत्त्वाचा खेळाडू विराट कोहलीचा हा विक्रम मोडू शकतो असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. रवि शास्त्री यांच्यामते विराटची बरोबरी करणाऱ्या या खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत. त्यामुळे आता रवि शास्त्री यांनी व्यक्त केलेला दावा कितपत खरा ठरणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2016 मध्ये 152.03 च्या स्ट्राइक रेटने आणि 81.08 च्या सरासरीने एकूण 973 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या त्या मोसमात विराटने चार शतके झळकावली होती. आयपीएलमधील विराट कोहलीचा हा विक्रम तेव्हापासून कोणालाही मोडता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर सारख्या फलंदाजांनी एका मोसमात 800 हून अधिक धावा केल्या पण विराट कोहलीच्या जवळ कोणीही जाऊ शकले नाही. मात्र आता रवी शास्त्री यांनी विराटचा हा विक्रम कोणता फलंदाज मोडू शकतो याचा अंदाज वर्तवला आहे. रवी शास्त्री यांच्यामते गुजरात जायंट्सचा सलामीवीर शुभमन गिल सध्या हा पराक्रम करू शकतो.
स्टार स्पोर्टवर बोलताना रवी शास्त्री यांनी याबाबत भाष्य केले आहे. सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या फलंदाजालाच इतक्या धावा करण्याची संधी मिळते. मला वाटतं शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याचवेळी तो टॉप ऑर्डरमध्येही खेळतो. त्यामुळे त्याला धावा करण्याची चांगली संधी मिळेल, असे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
"तो (गिल) सलामीवीर आहे आणि त्यामुळे त्याला धावा करण्याच्या अधिक संधी मिळतील. मला विश्वास आहे की तो शुभमन गिल हा विक्रम मोडेल कारण तो खूप जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला धावा करण्याच्या अधिक संधी मिळतील. खेळपट्ट्या चांगल्या आहेत आणि त्यामुळे जर तो दोन-तीन डावांत 80 ते 100 धावा सहज करु शकतो. त्याने तशाही 300-400 धावा केल्या आहेत. माझ्या मते एका हंगामात 900+ धावा करणे खूप कठीण आहे. त्यामुळे शक्य असल्यास केवळ सलामीवीरच हा विक्रम मोडू शकतो," असे रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शुभमन गिलने आयपीएल 2018 मध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी गिलने 13 सामन्यात 33.83 च्या सरासरीने 203 धावा केल्या होत्या. 2014 मध्ये त्याने 32.88 च्या सरासरीने 296 धावा केल्या होत्या. 2020 च्या मोसमात गिलने 14 सामन्यांमध्ये 33.84 च्या सरासरीने 440 धावा केल्या होत्या. 2021 मध्ये 478 तर 2022 मध्ये 16 सामन्यात 34.50 च्या सरासरीने 483 धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या नावावर आयपीएलमध्ये 15 अर्धशतके आहेत.