IPL 2023 LSG Mohsin Khan Surgery: आयपीएलमध्ये (IPL) मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 5 धावांनी पराभव केला. लखनऊने मुंबईसमोर 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने केलेली सुरुवात पाहता लखनऊचा ते अत्यंत सहजपणे पराभव करतील असं दिसत होतं. पण अखेरच्या षटकांमध्ये लखनऊच्या गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे मुंबईचा 5 धावांनी पराभव केला. या गोलंदाजांमध्ये मोहसीन खानदेखील (Mohsin Khan) होता. सामन्यानंतर मोहसीन खानने आपल्या आजारासंदर्भात खुलासा केला. जर आपण योग्य वेळी डॉक्टरकडे गेलो नसतो तर आपला हात कापावा लागला असता हे सांगताना तो भावूक झाला होता.
मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 11 धावांची गरज होती. यावेळी मैदानावर टीम डेव्हिड आणि कॅमेरुन ग्रीन यांच्यासारखे आक्रमक फलंदाज होते. पण मोहसीनने दबावात असतानाही जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनऊ संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करण्याच्या जवळ पोहोचला आहे.
मोहसीन खानला गेल्या वर्षी आपल्या खांद्याची सर्जरी करावी लागली होती. त्याच्या डाव्या खांद्यात रक्त गोठलं होतं. या शस्त्रक्रियेमुळे तो संपूर्ण घरगुती हंगाम आणि आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. मोहसीनने सांगितलं की, "एक वेळ अशी होती जेव्हा माझा मी क्रिकेट खेळू शकतो यावरुन विश्वास उडाला होता. कारण मला हात उचलणं शक्य होत नव्हतं. फार प्रयत्न केल्यानंतर हात उचलायचो तेव्हा तो सरळ होत नसे".
Ending the home stretch in Lucknow on a winning note
A lap of honour
From @LucknowIPL to all their fans - with love #TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/q3DVoToAaP
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
पुढे त्याने सांगितलं की "हा एक वैद्यकीय आजार होता. त्या आठवणींनी मी आजही घाबरतो. कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, जर मी अजून एका महिन्याचा उशीर केला असता तर माझा हात कापावा लागला असता".
"कोणत्याही क्रिकेटरला हा आजार होऊ नये. हा एक अजब आजार होता, ज्यामध्ये माझ्या नसा पूर्ण बंद झाल्या होत्या. त्यात रक्त गोठलेलं होतं. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, राजीव शुक्ला, लखनऊ संघ आणि माझ्या कुटुंबाने या कठीण वेळेत मला खूप पाठिंबा दिला".
यावेळी त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये काय विचार करत होतास असं विचारलं असता म्हणाला की "नक्कीच माझ्यावर दबाव होता. आम्ही अभ्यास करताना जे करतो तेच मी येथे करण्याचा प्रयत्न केला. मी 10 किंवा 11 धावा वाचवण्याचा नाही, तर 6 चांगले चेंडू टाकण्याचा विचार करत होतो".
मोहसीनने जानेवारी 2000 मध्ये उत्तर प्रदेशच्या रणजी क्रिकेट संघातून पदार्पण केलं होतं. मध्य प्रदेशात खेळलेला हा त्याचा एकमेव रणजी सामना आहे. या सामन्यात त्याने 2 विकेट घेतले होते. तर 2018 मध्ये महाराष्ट्राविरोधातील सामन्यातून अ श्रेणीतील क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. अ श्रेणीतील 17 सामन्यात त्याने 26 विकेट्स घेतल्या आहेत. तर 38 टी-20 सामन्यात 49 विकेट्स घेतल्या आहेत.