Kohli Gambhir Fight: सोमवारी लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) संघाच्या कोचिंग टीमचा भाग असलेला गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळालं. या दोघांचे इतक्या कडाक्याचे भांडण झालं की आता हाणामारी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इतर खेळांडूंनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांमधली वाद काही प्रमाणात शमला पण हे भांडण इतक्यावरच थांबेल असं कालच्या प्रसंगावरुन तरी वाटत नाही. कारण आता या वादानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विराटने इन्स्टा स्टोरीतून आपली भूमिका मांडली आहे.
नेमकं झालं काय?
दोन तीन षटके असतानाही लखनऊचा संघ मॅच हरण्याच्या परिस्थीत होता. त्यावेळी अफगाणिस्तानचा नवीन-उल-हक क्रीझवर अमित मिश्रासोबत फलंदाजी करत होता. दरम्यान, विराट कोहलीच्या काही मुद्द्यावरून अमित मिश्रासोबत वाद झाला होता. त्यानंतर अंपायरने मध्यस्थी केली अन् प्रकरण मिटले. मात्र काही स्क्रीनशॉर्टनुसार लखनऊचा बॅट्समन नवीन उल हक आणि विाट कोहलीदेखील या ओव्हरमध्ये भिडले होते. आरसीबीने हा सामना 18 धावांनी जिंकला. त्यानंतर परंपरेनुसार दोन्ही संघांचे खेळाडू हात मिळवण्यासाठी मैदानात आले. त्यादरम्यान नवीन आणि विराटने हस्तांदोलन केले अन् दोघे एकमेकांना काहीतरी बोलले. तितक्यात विराटने चालताना नवीनच हात झटकला. यानंतर विराट मागे फिरला, काहीतरी म्हणाला. दोघांमधला वाद इथेच संपला.
त्यानंतर विराट आणि गौतम गंभीर यांच्यात सामना झाला. लखनऊचा सलामीवीर काइल मेयर्स विराटसोबत फिरताना बोलत होता. विराट आणि मेयर्समधील वादही वाढताना दिसताच गौतम गंभीर तिथे आला. त्यानंतर विराट पुढे जाताना काहीतरी म्हणाला. तितक्यात गौतम गंभीर वेगाने विराटकडे गेला आणि दोघांमध्ये भांडणास सुरुवात झाली. केएल राहुल आणि अमित मिश्राने मिळून हा वाद कसा तरी शांत केला. या भांडणानंतर कोहली आणि केएल राहुल उभे राहून एकमेकांशी बोलत होते. त्यामुळे नवीन तिथून पास झाला. राहुलने ओरडून नवीनला बोलावले. नवीन वळला, पण त्याने परत येण्यास साफ नकार दिला आणि पुढे निघून गेला.
विराटने मांडली भूमिका
या सर्व वादानंतर मंगळवारी सकाळी विराट कोहलीने आपल्या इन्स्टा स्टोमधून आपली भूमिका मांडली आहे. "आपण जे काही ऐकतो ते मत असतं, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोनातून असते पण ते सत्य नसते," असा Marcus Aurelius यांचा कोट विराटने आपल्या इन्स्टा स्टोरीला ठेवला आहे.
दरम्यान, या सामन्यानंतर बीसीसीआयने गंभीर, विराट आणि नवीन यांना मोठा दंड ठोठावला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल तिघांना 100 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे.