Ruturaj Gaikwad Can Break Virat Kohli Record: यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगमध्ये पहिल्या सामन्यापासूनच चर्चेत असणारा खेळाडू म्हणजे चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड! (Ruturaj Gaikwad ) अस्सल पुणेकर असलेल्या ऋतुराजने गुजरात टायटन्सविरुद्धच्या यंदाच्या पर्वातील पहिल्याच सामन्यात 92 धावा केल्या. आतापर्यंत (5 एप्रिल 2022) आयपीएलमध्ये एकूण 8 सामने झाले आहेत. या 8 सामन्यांमध्ये सर्वाधिक सातत्य राखणारा फलंदाज म्हणून ऋतुराजकडे पाहिलं जात आहे. अगदी वेगवान गोलंदाजी असो किंवा फिरकी गोलंदाजी असो ऋतुराज गोलंदाजांवर तुटून पडत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे 2 सामने आतापर्यंतच्या स्पर्धेत झाले आहेत. या 2 सामन्यांमध्ये ऋतुराजने 74.50 च्या सरासरीने 149 धावा केल्या आहेत. या धावा जमवताना त्याच् स्ट्राइक रेट हा तब्बल 183.95 इतका राहिला आहे. या 2 खेळींमध्ये त्याने एकूण 7 चौकार आणि 6 षटकार लगावला आहे. अर्थात त्याच्या चौकार आणि षटकारांची आकडेवारी पाहूनच तो एक परफेक्ट टी-20 प्लेअर आहे हे लक्षात येतं. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात तो शतकापासून अवघा 8 धावा दूर राहिला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामन्यात अवघ्या 50 बॉलमध्ये त्याने 4 चौकार आणि 9 षटकारांसहीत 92 धावा केल्या.
Ru tu the Star! #GTvCSK #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/R3jH7bczNU
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 31, 2023
त्यानंतर चेन्नईच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ऋतुराजने 31 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या होत्या. हा सामना चेन्नईने 12 धावांनी जिंकला.
The Quickfire Missile!#CSKVLSG #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/0Z4CmO1oe3
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2023
ऋतुराजची पहिल्या 2 सामन्यांमधील फलंदाजी पाहून तो यंदाचं सिझन गाजवणार असं म्हटलं जात आहे. सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी ऑरेंज कॅपही ऋतुराजकडेच आहे. 26 वर्षीय ऋतुराजने मागील वर्षीच ऑरेंज कॅप पटकावली आहे. त्याने 2021 च्या पर्वामध्ये 16 सामन्यांमध्ये 136.26 च्या स्ट्राइक रेटने 635 धावा केल्या होत्या. ऋतुराजचा यंदाचा फॉर्म पाहता तोच पुन्हा एकदा ऑरेंज कॅप पटकावेल असं दिसत आहे.
Here's to holding on to it!#CSKvLSG #WhistlePodu pic.twitter.com/VvYXR3NljV
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2023
मात्र यंदाच्या पर्वामध्ये ऋतुराज आणखीन एक विक्रम स्वत:च्या नावावर करु शकतो. हा विक्रम म्हणजेच एकाच पर्वामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा! हा विक्रम सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. आरसीबीकडून खेळताना विराटने 2016 मध्ये तब्बल 973 धावा कुटल्या होत्या. कोणत्याही पर्वामध्ये कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या पर्वामध्ये चेन्नईने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली तर ऋतुराज सहज विराटचा हा विक्रम मोडू शकतो. मात्र हे करण्यासाठी त्याला पहिल्या 2 सामन्यांमधील फॉर्म कायम ठेवणं आवश्यक आहे.