IPL 2023: दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) यंदाचा सिझन काहीसा कठीण जाण्याची शक्यता आहे. टीमचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) यंदाच्या सिझनमध्ये खेळणार नाहीये. डिसेंबरमध्ये झालेल्या गंभीर अपघातानंतर पंत अजून पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. मात्र असं असूनही पंतची मैदानात उपस्थिती राहणार आहे. तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं असेल, पण दिल्लीचे हेड कोच रिकी पॉन्टीग (Ricky Ponting) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नुकंतच दिल्ली कॅपिटल्सची नवी जर्सी लाँच करण्यात आली. यावेळी पंतबद्दल बोलताना रिकी पॉन्टीग म्हणाले, ''माझ्या आदर्श जगात ऋषभ पंत प्रत्येक मॅचमध्ये डगआउटमध्ये बसलेला असतो. जर हे शक्य नसेल तर आम्ही त्याला प्रत्येक पद्धतीने टीमचा भाग बनवणार आहोत. यावेळी आम्ही त्याचा नंबर आमच्या जर्सी आणि कॅपवर लावण्याबाबत विचार करतोय."
पोन्टिंग पुढे म्हणाला, ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा हृदय आणि आत्मा आहे. आम्हाला फक्त इतकं सांगायचं आहे की, जरी तो आमच्या सोबत नसला तरीही तो आमचा लीडर आहे.
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये त्याची जागा कोण घेणार हा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. याबाबत बोलातना पॉन्टीग म्हणाला, "आम्ही अजून याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये. मात्र सरफराज खान टीममध्ये सामील झाला आहे. त्याच्याबाबत सराव सामन्यांनंतर निर्णय घेतला जाईल. दरम्यान पंतच्या अनुपस्थितीमुळे एक पोकळी निर्माण झाली आहे."
30 डिसेंबर 2022 रोजी मोठा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. आईला सरप्राईज देण्यासाठी तो घराच्या दिशेने निघाला, मात्र वाटेत त्याचा अपघात झाला. रूरकीजवळ पंतचा हा अपघात झाला होता. यानंतर पंतवर उपचार करण्यात आले. सध्या तो उपचार घेत असून क्रिकेटच्या मैदानापासून काही काळ दूर राहणार आहे.
ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेविड वॉर्नरकडे सोपवण्यात आली आहे. पंतने 2016 मध्ये दिल्लीकडून खेळण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने 98 समाने खेळले असून 34.61 च्या सरासरीने 2838 रन्स केले आहेत. 128 नाबाद हा त्याचा सर्वोत्तम खेळ आहे.