IPL 2022 : आयपीएलमध्ये स्टेन गन पुन्हा धडाडणार, मिळणार 'ही' मोठी जबाबदारी

डेल स्टेनच्या नव्या जबाबदारीबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Updated: Dec 16, 2021, 07:48 PM IST
IPL 2022 : आयपीएलमध्ये स्टेन गन पुन्हा धडाडणार, मिळणार 'ही' मोठी जबाबदारी title=

IPL 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Internation Cricket) आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांचा थरकाप उडवणारा गोलंदाज म्हणजे डेल स्टेन (Dale Steyn). जागतिक क्रिकेटमधलं एक मोठं नाव, स्विंग किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनचा आयपीएलमध्येही (IPL) दबदबा होता. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळताना त्याने संघासाठी भरीव कामगिरी केली. 

आता आयपीएलमध्ये ही स्टेन गन पुन्हा एकदा धडाडण्यासाठी सज्ज झाली आहे. आयपीएलमध्ये (IPL 2022) डेल स्टेनला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात डेल स्टेनची सनरायजर्स हैदराबादच्या बॉलिंग कोचपदी नियुक्ती केली जाणार आहे. (Dale Steyn Can Become Bowling Coach Of Sunrisers Hyderabad)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डेल स्टेन आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक बनणार आहे. फ्रँचायझीच्या एका अधिकाऱ्याने डेल स्टेनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

संघाला अनुभवी खेळाडूची गरज
सनरायझर्स हैदराबादचा मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लक्ष्मणला बंगळुरू इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (National Cricket Academy) प्रमुख बनवण्यात आलं आहे. याशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी (Tom Moody) आणि फलंदाज प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन (Brad Haddin) यांनीही आपण उपलब्ध नसल्याचं हैदराबाद संघाला कळवलं आहे. अशात संघाला एका अनुभवी खेळाडूची गरज आहे. ही उणीव डेल स्टेन भरुन काढू शकतो. 

आयपीएलमधली कामगिरी
आयपीएल 2013 ते 2015 पर्यंत डेल स्टेन सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. त्याने 95 सामन्यात 97 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये हैदराबाद व्यतिरिक्त डेल स्टेन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात लायन्स आणि डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघाकडूनही खेळला. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द
काही महिन्यांपूर्वीच डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टेनने 93 कसोटीत तब्बल 439 विकेट घेतल्य आहेत. तर 125 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 196 विकेट जमा आहेत. 47 टी20 सामन्यात त्याने 64 विकेट घेतल्या. 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा स्टेन 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.