यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) टॉप 4 संघ ठरले आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिट्ल्स (DC) , चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) समावेश आहे. या मोसमातील पहिला क्वालिफायर सामन्यात IPL 2021 Qualifier 1 दिल्ली विरुद्ध चेन्नई आमनेसामने भिडणार आहेत. (IPL 2021 Qualifier 1 Chennai vs Delhi Shikhar dhawan ms dhoni 5 game changer players who have the potential to win their team)
जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल. तर पराभूत होणाऱ्या संघालाही दुसरी संधी मिळेल. मात्र पहिल्याच फेरीत फायनलमध्ये पोहचण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. या क्वालिफायर सामन्यात कोणता संघ जिंकणार, हे दोन्ही संघातील 5 खेळाडूंच्या कामगिरीवर ठरणार आहे. दोन्ही टीमच्या पाचही खेळाडूंमध्ये एकहाती सामना पालटण्याची क्षमता आहे.
महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni)
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्लेऑफमधील सर्वाधिक अनुभव आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात आपल्या टीमला एकूण 11 वेळा प्लेऑफ आणि 8 वेळा अंतिम सामन्यात पोहचवलंय. धोनी मैदानात अगदी शांत डोक्याने अनेक निर्णय घेतो. धोनी एका निर्णयाने सामना आपल्या बाजूने फिरवतो. त्यामुळे धोनीची या सामन्यातील भूमिका हा निर्णायक ठरणार आहे.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)
चेन्नईचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराद गायकवाड बॅटिंगने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची पिसं काढतोय. ऋतुराज सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. ऋतुराजने या मोसमात आतापर्यंत एकूण 20 सिक्स आणि 56 फोर लगावले आहेत. त्यामुळे चेन्नईला ऋतुराजकडून साखळी फेरीतील कामगिरी प्लेऑफच्या या महत्त्वाच्या सामन्यातही अपेक्षित असणार आहे.
रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)
रवींद्र जाडेजामध्ये धोनीचा विश्वासू आणि चेन्नईचा हुकमाचा एक्का. जिथे कमी तिथे जाडेजा. जाडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी करतोय.
गेल्या काही सामन्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांना जाडेजामधील गेम फिनीशरही पाहायला मिळाला. जाडेजाने अनेकदा सामना चेन्नईच्या बाजूने फिरवलाय. त्यामुळे जाडेजाकडून तिन्ही आघाड्यांवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा टीम मॅनेजमेंटला असणार आहे.
एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje)
एनरिक नॉर्खिया हा दिल्लीच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. नॉर्खियाची प्लेऑफच्या या निर्णायक सामन्यातील भूमिकाही महत्तवपूर्ण असणार आहे. एनरिक हा 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात खेळला नव्हता.
मात्र दुसऱ्या टपप्यातील 6 सामन्यांमध्ये त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत. एनरिकने टीमला अनेकदा निर्णायक क्षणी विकेट मिळवून दिले आहेत. त्यामुळे या सामन्यात एनरिकची चेन्नई विरुद्ध काय रणनिती असणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
शिखर धवन (Shikhar Dhawan)
दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन हा आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. शिखर या मोसमात दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शिखरने आतापर्यंत 14 साखळी सामन्यांमध्ये 544 धावा चोपल्या आहेत. शिखरवर दिल्लीला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असणार आहे.