यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातला (IPL 2021 Match 52) 52 वा सामना हा आज (6 ऑक्टोबर) अबूधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये (Sheikh ) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैजराबाद या सामन्यात आमनेसामने भिडणार आहे. (ipl 2021 match 52nd rcb vs srh Sheikh Zayed Stadium at Abu Dhabi head to head record)
बंगळुरुने याआधीच प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून नेट रन रेट आणखी चांगला करण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. तर बंगळुरुला पराभूत करुन शेवट गोड करण्याच्या उद्देशाने हैदराबाद मैदानात उतरेल.
अशी आहे आकडेवारी
आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ एकूण 19 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यात हैदराबाद वरचढ राहिली आहे. हैदराबादने बंगळुरुला 10 सामन्यांमध्ये पराभूत केलंय. तर बंगळुरुने 8 वेळा हैदराबादवर मात केली आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येतायेत. याआधी पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यात बंगळुरुने बाजी मारली होती.
मागील 5 सामन्यांची आकडेवारी
या दोन्ही संघात मागील झालेल्या 5 सामन्यांचा निकाल हा बंगळुरुच्या बाजूने आहे. बंगळुरुने 5 पैकी 3 सामने जिंकलेत. तर हैदराबादनेही 2 मॅचेस जिंकल्या आहेत.
विराट या खेळाडूला संधी देणार?
विराटच्या नेतृत्वात बंगळुरुने या वेळेस प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे बंगळुरु निश्चिंत असणार आहे. बंगळुरुच्या संघात एकसेएक फलंदाज आहेत. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. यापैकी एक खेळाडू म्हणजे मोहम्मद अजहरुद्दीन.
अझहरुद्दीनने काही महिन्यांपूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी 20 करंडकात मुंबई विरुद्ध 37 चेंडूत शानदार शतक ठोकलं होतं. त्याने या सामन्यात एकूण 54 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 11 सिक्सच्या मदतीने 137 धावांची वादळी खेळी केली होती.
त्याने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर बंगळुरुने त्याला 20 लाख या बेस प्राईजवर आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे या सामन्यात अझहरुद्दीनला आयपीएल डेब्यूची संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.