मुंबई : कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे जगभरातल्या सगळ्याच क्रीडा स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या धोक्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचं ट्विट आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं आहे.
NEWS : IPL 2020 suspended till further notice
More details here - https://t.co/ZmC2xndkUN pic.twitter.com/zWVIeI61hK
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2020
आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं कालच एका टीमच्या अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितलं होतं, पण बीसीसीआयने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मात्र आयपीएलबाबतच्या सगळ्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाऊन वाढवल्यामुळे आयपीएल एप्रिल-मेपर्यंत होण्याचा प्रश्नच नव्हता. २९ मार्च ते २४ मे या कालावधीत आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार होती. कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता सुरुवातीला आयपीएल १४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती.
लॉकडाऊन वाढवण्याबाबात केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतात, हे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह पाहत होते. पण लॉकडाऊन वाढवल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यावाचून पर्याय नव्हता, असं सांगितलं जात आहे.
आयपीएल स्थगित करण्यात आली असली, तरी वर्षाच्या शेवटी स्पर्धा खेळवली जाईल, अशी अपेक्षा आयपीएल टीमच्या एका अधिकाऱ्याने बोलून दाखवली आहे. सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या आशिया कपच्या तारखा बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएल खेळवण्यासाठी आशिया कपची तारीख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र याला विरोध केला आहे. आयपीएल खेळवण्यासाठी आशिया कप रद्द करण्याला आम्ही तयार होणार नाही, असं पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले आहेत.