मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. कोरोनामुळे यंदाच्या वर्षीची आयपीएलही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यातच आता सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या आशिया कपच्या तारखा बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएल खेळवण्यासाठी आशिया कपची तारीख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र याला विरोध केला आहे.
आयपीएल खेळवण्यासाठी आशिया कप रद्द करण्याला आम्ही तयार होणार नाही, असं पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले आहेत. आयपीएलचा १३ वा मोसम २९ मार्च ते २४ मेपर्यंत खेळवला जाणार होता. पण कोरोनामुळे सुरुवातीला आयपीएल १४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण देशातील लॉकडाऊन वाढल्यामुळे आता स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
'आयपीएलसाठी आशिया कप रद्द करण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या चर्चा मीदेखील ऐकल्या आहेत. आशिया कप खेळवायचा का नाही हे फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यावर अवलंबून असणार नाही,' असं मणी म्हणाले.
आशिया कपचं आयोजन पाकिस्तानमध्येच होणार होतं, पण भारताने खेळायला नकार दिल्यामुळे आशिया कप दुबई आणि अबू धाबीमध्ये हलवण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला.
'क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली तर आशिया कप खेळवणं महत्त्वाचं आहे. कारण स्पर्धेतून मिळणारा पैसा आशियाई क्रिकेटच्या विकासासाठी वापरला जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. यावर्षी आशिया कप खेळवणं हे आव्हान आहे, कारण स्पर्धा होईल का नाही, हे आपल्याला माहिती नाही' अशी प्रतिक्रिया एहसान मणी यांनी दिली आहे.
'परिस्थिती बदलली तर आशिया कप खेळवला गेला पाहिजे, कारण पुढची दोन वर्ष यातून मिळणारा पैसा क्रिकेटच्या विकासासाठी वापरता येईल,' असं वक्तव्य एहसान मणींनी केलं.