मुंबई : आयपीएल २०२० साठीचा लिलाव गुरुवारी पार पडला. एकूण ६२ खेळाडूंची विक्री या लिलावात झाली. कोलकात्याच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातला दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू आणि सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरला. युवराज सिंग हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महाग खेळाडू आहे. २०१५ साली दिल्लीने युवराजला १६ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
पॅट कमिन्ससोबतच कोलकात्याने इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनला ५.२५ कोटी रुपयांना विकत घेतलं. मॉर्गनला विकत घेतल्यामुळे आता तोच कोलकात्याचा कर्णधार होईल, असं बोललं जात होतं. पण दिनेश कार्तिक हाच आमचा कर्णधार राहिल, असं कोलकात्याचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅक्कलमने स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे पंजाबच्या टीमनेही त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. के.एल.राहुल हा पंजाबच्या टीमचा कर्णधार असणार आहे. मागच्या वर्षी अश्विनच्या नेतृत्वात पंजाबची टीम मैदानात उतरली होती, पण पंजाबने यंदा अश्विनला दिल्लीच्या टीमला देऊन टाकलं.