IPL 2020 : ओपनिंग मॅचने तोडली सगळी रेकॉर्ड, तब्बल एवढ्या प्रेक्षकांनी बघितला सामना

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आयपीएलचा १३वा मोसम भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात येत आहे.

Updated: Sep 22, 2020, 05:58 PM IST
IPL 2020 : ओपनिंग मॅचने तोडली सगळी रेकॉर्ड, तब्बल एवढ्या प्रेक्षकांनी बघितला सामना title=

दुबई : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आयपीएलचा १३वा मोसम भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे सप्टेंबर महिन्यात सुरू झाली, तसंच व्हायरसचं संक्रमण होऊ नये म्हणून खाली स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले जात आहेत. पण या सगळ्याचा आयपीएलच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आयपीएलचा पहिलाच सामना जवळपास २० कोटी लोकांनी पाहिल्याच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं. 

कोणत्याही देशातल्या खेळाच्या लीगच्या उद्घाटन मॅचसाठीचा हा विक्रमी आकडा आहे. कोणत्याही लीगचा पहिला सामना एवढ्या दर्शकांनी याआधी बघितला नव्हता. आयपीएलच्या १३वा मोसमाचा पहिला सामना १९ सप्टेंबरला अबु धाबीच्या शेख जायेद स्टेडियममध्ये झाला. मुंबई आणि चेन्नईमध्ये झालेल्या या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. 

'आयपीएलच्या उद्घाटन मॅचने नवीन रेकॉर्ड कायम केलं आहे. बीएआरसीनुसार मॅचला २० कोटी लोकांनी बघितलं. हे कोणत्याही देशाच्या लीगच्या उद्घाटनाच्या सामन्याची सर्वाधिक आकडेवारी आहे,' असं ट्विट जय शाह यांनी केलं. 

आयपीएल २०२० चे सामने युएईत अबु धाबी, शारजाह आणि दुबई या तीन ठिकाणी होत आहेत. स्पर्धेची फायनल १० नोव्हेंबरला होणार आहे. फायनल मॅच कुठे होणार, याची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.