'आयपीएल'नेच धोनीला ट्रोल केलं, विचारलं 'खेळू शकेल का?'

आयपीएलच्या २०२० च्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होत आहे. 

Updated: Feb 24, 2020, 07:38 PM IST
'आयपीएल'नेच धोनीला ट्रोल केलं, विचारलं 'खेळू शकेल का?' title=

मुंबई : आयपीएलच्या २०२० च्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये होणार आहे. या मॅचला १ महिन्यापेक्षा जास्त कालावधी असला, तरी आयपीएलकडून जाहिरातींना सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या पहिल्याच जाहिरातीमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला ट्रोल केलं आहे.

आयपीएलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'ऑफिसमध्ये एक वृद्ध कर्मचारी हातात अनेक फाईल घेऊन जात आहे. या फाईल घेऊन जात असताना या कर्मचाऱ्याचा तोल जातो आणि फाईल जमिनीवर पडतात.'

फाईल जमिनीवर पडल्यानंतर एक जण 'अंकल कब तक खिचेंगे', असं त्या वृद्धाला म्हणतो. यानंतर 'हम तो खिंच लेंगे, क्या यह (धोनी) खेल पाएगा?' असं हा वृद्ध कर्मचारी विचारतो.

आयपीएलच्या या जाहिरातीवर चेन्नई आणि धोनीच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'धोनी खेळेल आणि मारेलपण', असं धोनीचे चाहते म्हणत आहेत. दुसरीकडे चेन्नईच्या टीमनेही आयपीएलच्या या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नईने ट्विट केलेल्या फोटोमध्ये धोनी हीच जाहिरात बघतना दिसत आहे. तसंच धोनी नेहमीसारखाच यावेळीही मैदानात दिसेल, असं चेन्नईने ट्विटमधून सांगितलं आहे.

आयपीएलच्या या जाहिरातीमध्ये विराट कोहली आणि बंगळुरूचीही मस्करी करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये वेटर कोहलीचं नाव असलेला टी-शर्ट घातलेला दाखवण्यात आला आहे. या वेटरला बघून ग्राहक एक कप जिंकायला १२ वर्ष लावणार का? असा प्रश्न विचारतो. विराट कोहलीच्या बंगळुरूला अजून एकही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही.