IPL 2020 : धोनीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड

धोनीने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

Updated: Oct 20, 2020, 08:56 AM IST
IPL 2020 : धोनीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड title=

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत आपल्या फलंदाजीची छाप सोडलेली नाही. ज्यामुळे सीएसकेची टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.

सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच एमएस धोनीने जगातील या सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. मात्र, रॉयल्सकडून या सामन्यात सीएसकेला पराभवाला सामोरे जावे लागले.

200 आयपीएल सामने खेळणारा धोनी एकमेव खेळाडू

आयपीएल 2020 चा 37 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (सीएसके वि आरआर) यांच्यात खेळला गेला. हा सामना धोनीच्या आयपीएल कारकिर्दीचा 200 वा सामना होता. अशा परिस्थितीत महेंद्रसिंह धोनी (एमएस धोनी) इंडियन प्रीमियर लीगमध्ये 200 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा (एमआय) कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 197 आयपीएल सामने खेळले आहेत. या 200 आयपीएल सामन्यादरम्यान माही आयपीएल फ्रँचायझी सीएसके आणि पुणे सुपर जायंट्सकडून खेळला आहे. यासह धोनीने आयपीएल कारकिर्दीच्या या ऐतिहासिक सामन्यात सुपर किंग्जकडून खेळत 4000 धावांचा टप्पादेखील ओलांडला.

13 वर्षांच्या प्रवासात अनेक विक्रम

आयपीएल 2008 पासून ते आयपीएल 2020 धोनी या लीगचा एक भाग आहे. या 13 वर्षांच्या प्रवासादरम्यान, माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने अनेक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे. माहीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना 3 वेळा विजय आणि 8 वेळा फायनलपर्यंच धडक मारली आहे.

धोनी हा विकेटकीपर म्हणून 150 विकेट घेणारा आयपीएलचा सर्वात यशस्वी विकेटकीपर आहे. याशिवाय आयपीएलमधील कर्णधार म्हणून धोनीने 104 सामने जिंकून अनोखा पराक्रम केला आहे. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीने या स्पर्धेत भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक 215 सिक्स ठोकले आहेत. त्याचबरोबर माहीनेही या 200 सामन्यात 4596 धावा केल्या आहेत.