शारजाह : आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब अजूनही गुणांच्या यादीत सर्वात शेवटी आहे. पंजाबचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेल 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात संघासाठी कशी कामगिरी करतो हे पाहावं लागणार आहे. कारण आतापर्यंत पंजाबने अनेक सामने गमवले आहेत. आज पंजाबसाठी करो या मरोची लढाई आहे. आज जिंकले तर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम राहील, अन्यथा अव्वल चारमध्ये जाण्याचे स्वप्न भंग होईल. अशा कठीण परिस्थितीत टी -20 चा महान फलंदाज ख्रिस गेल आज पुन्हा मैदानात येऊ शकतो. हंगामाच्या सुरुवातीपासूनच गेल फिट नव्हता. त्यामुळे तो एकही सामना खेळलेला नाही.
आज 15 ऑक्टोबर रोजी युवा कर्णधार केएल राहुलचा किंग्ज इलेव्हन पंजाब आणि विराटची आर्मी आरसीबी यांच्यात सामना आहे. शारजाहच्या या मैदानात आज फोर आणि सिक्सचा पाऊस पडू शकतो.
नुकताच हॉस्पिटलमधून परतल्यानंतर ख्रिस गेलने दोन दिवसांपूर्वी स्वत: जाहीर केले की तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळणार आहे. अन्नातील विषबाधामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अशा परिस्थितीत आज गेलची बॅट चालली तर धावांचा पाऊस पडू शकतो. पंजाबलाही विजयाची नितांत गरज आहे.
ख्रिस गेल टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून ओळखला जातो. गेली 12 वर्षे तो आयपीएलचा एक भाग आहे आणि त्याला आयपीएलचा सिक्सर किंग म्हटले जाते. गेल आयपीएलमध्ये यापूर्वी कोलाकला नाइट रायडर्सकडून (केकेआर) खेळायचा, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०११ मध्ये त्याचा संघात त्याचा समावेश केला होता. त्यानंतर तो 2018 पासून तो किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळत आहे.
ख्रिस गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 4484 धावा केल्या आहेत. यात 326 सिक्सचा समावेश आहे. 2013 मध्ये त्याने विक्रम केला जो आजपर्यंत कोणी मोडलेला नाही. पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 13 फोर आणि 17 सिक्सच्या नाबाद 175 धावा केल्या होत्या.
ख्रिस गेलने फक्त 30 बॉलमध्ये वेगवान शतक ठोकले होते. अद्याप कोणीही त्याचा विक्रम मोडलेला नाही. गेलच्या आधी हा विक्रम युसुफ पठाणच्या नावावर होता. त्याने 37 चेंडूत शतक ठोकले होते.
गेल जेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये येईल तेव्हा संघात मोठे बदल होऊ शकतात. सामन्यात गेल सलामीला येईल. अशा परिस्थितीत राहुल किंवा अग्रवाल तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतात. मुजीब उर रहमान किंवा ग्लेन मॅक्सवेलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल.