मुंबई : भारताच्या वनडे टीमचा उपकर्णधार आणि आयपीएलच्या मुंबई टीमचा कर्णधार रोहित शर्माचा आज ३२वा वाढदिवस आहे. रोहितने त्याचा हा वाढदिवस मुंबई टीमसोबत साजरा केला. मुंबईच्या टीमने रोहितसाठी खास केक मागवला होता. रोहितने केक कापल्यानंतर युवराज सिंगने हा केक रोहितच्या तोंडाला फासला, मुंबई टीमच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2019
Looks as sweet as @ImRo45's timing #HitmanDay #HappyBirthdayRohit #OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/fGB2XjJ2x7
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2019
आयपीएलच्या फेसबूक पेजवरूनही रोहित शर्माला खास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. २०१२ साली वाढदिवसाच्या दिवशीच रोहित शर्माने ईडन गार्डनच्या मैदानात शतक केलं होतं. या शतकाचा व्हिडिओ आयपीएलने शेअर केला आहे. ६० बॉलमध्ये रोहित शर्माने नाबाद १०९ रनची खेळी केली होती. यामध्ये १२ फोर ५ सिक्सचा समावेश होता. रोहितच्या या शतकामुळे मुंबईने २० ओव्हरमध्ये १८३ रन केले. मुंबईचा या मॅचमध्ये २७ रननी विजय झाला.
२००७ साली रोहित शर्माने आयर्लंडविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २०६ वनडेमध्ये रोहितने ४७.४च्या सरासरीने ८,०१० रन केले आहेत. यामध्ये २२ शतकं आणि ४१ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९४ आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये रोहितने ९४ मॅचमध्ये ३२.३८ची सरासरी आणि १३७.६८च्या स्ट्राईक रेटने १६९३ रन केले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितने २७ मॅचमध्ये १,५८५ रन केले.
- वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा एकमेव खेळाडू.
- २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये रोहितने २६४ रनची खेळी केली होती. वनडे क्रिकेटमधला हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे.
- २६४ रनच्या या खेळीमध्ये रोहितने वनडे क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक फोर मारले. या खेळीमध्ये रोहितने ३३ फोर मारले होते.
- वर्ल्ड कपच्या नॉकआऊट सामन्यामध्ये शतक करणारा गांगुलीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू
- आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये हॅट्रिक, २००९ साली रोहित आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळायचा. यावेळी मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी ड्युमिनी यांची विकेट घेऊन हॅट्रिक घेतली.
- २०११ सालपासून रोहित आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळायला लागला. तीन आयपीएल जिंकणारा रोहित पहिला कर्णधार. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएलमध्ये विजय मिळवला. यानंतर धोनीने अशी कामगिरी केली. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ साली आयपीएल जिंकली.
- क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये शतकं करणारा रोहित दुसरा भारतीय. याआधी सुरेश रैनाच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. २०१० सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये शतक करून रैनाने पहिल्यांदाच हा विक्रम केला होता.
- भारतात टी-२० मॅचमध्ये शतक करणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू. २००७-०८ साली सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत रोहितने गुजरातविरुद्ध ४५ बॉलमध्ये नाबाद १०१ रन केल्या होत्या.
- टेस्ट क्रिकेटच्या पदार्पणात आणि दुसऱ्या टेस्टमध्येही शतक. पहिल्या टेस्टमध्ये रोहितने १७७ रन आणि दुसऱ्या टेस्टमध्ये १११ रन केल्या होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये सौरव गांगुली आणि मोहम्मद अजहरुद्दीननंतर शतक करणारा रोहित तिसरा भारतीय