मुंबई : कायरन पोलार्डच्या तडाखेबाज खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला आहे. कायरन पोलार्डने ३१ बॉलमध्ये ८३ रनची खेळी केली. यामध्ये १० सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. कायरन पोलार्डच्या या खेळीमुळे बॉलीवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग भलताच खुश झाला आहे. या मॅचनंतर ट्विट करताना रणवीर सिंगने पोलार्डचा उल्लेख राक्षस असा केला आहे.
रणवीर ट्विटरवर म्हणाला, 'पोलार्ड एक राक्षस! जबरदस्त खेळी!!! दृढ विश्वास!!! सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम!!! दिवसाचा कर्णधार- प्रेरणादायी आणि प्रतिभाशाली नेतृत्व', असं ट्विट रणवीर सिंगने केलं आहे.
POLLARD THE MONSTER!!!!! what a stellar innings!!! What conviction!!! Best of the best!!! Captain for the day - leading from the front and inspiring!!! Brilliant !!! #MIvKXIP
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 10, 2019
मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये १५ रनची गरज होती. तेव्हा पंजाबचा कर्णधार अश्विनने अंकित राजपूतकडे बॉल दिला. राजपूतने पहिलाच बॉल नो बॉल टाकला. या बॉलवर पोलार्डने सिक्स मारली. यानंतरच्या फ्री हिटवर पोलार्डने फोर मारली. शेवटच्या ओव्हरच्या एकाच बॉलमध्ये मुंबईला ११ रन मिळाल्यामुळे विजय सोपा वाटत होता. पण राजपूतने पोलार्डला माघारी पाठवून मुंबईचं टेन्शन वाढवलं. शेवटच्या बॉलवर मुंबईला विजयासाठी २ रनची गरज होती, तेव्हा अल्झारी जोसेफने २ रन करून मुंबईला जिंकवलं.
पंजाबच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर अंकित राजपूत, रवीचंद्रन अश्विन आणि सॅम कुरनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईपुढे मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवलं. पंजाबने २० ओव्हरमध्ये १९७/४ एवढा स्कोअर केला. केएल राहुलने ६४ बॉलमध्ये नाबाद १०० रनची खेळी केली.