मुंबई : 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हार्दिक पांड्याने महिलांबद्दल केलेले आक्षेपार्ह विधान त्याच्यासोबत असलेल्या केएल राहुलला देखील चांगलेच महागात पडले होते. याची किंमत या दोघांना भोगावी लागली. 'कॉफी विथ करण' या शोमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून वाद झाल्यानंतर, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने निलंबन केलं होतं. ही समिती सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून हार्दिक आणि राहुलला भारतात परतावं लागलं होतं. या सर्व प्रकाराचा वचपा केएल राहुलने पद्धतशीर आपल्या बॅटने घेतला आहे.
मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात १० एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला होता. मुंबईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंग करण्यास भाग पाडले. ओपनिंगला आलेला केएल राहुल अखेरपर्यंत टिकून होता. मॅचची १९ वी ओव्हर हार्दिक पांड्याने टाकली. स्ट्राईक वर केएल राहुल खेळत होता.
पांड्या समोर येताच केएल राहुलने १९ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हरच्या वरुन सणसणीत सिक्स भिरकावला. पुढील बॉलवर पांड्याने टाकलेल्या धीम्या बॉलवर फोर मारला. तिसऱ्या बॉलवर फाईन लेगच्या दिशेने हुक शॉट मारत सिक्स लगावला.
अशा प्रकारे राहुलने पांड्याच्या ओव्हरच्या पहिल्या ३ बॉलवर १४ रन कुटल्या होत्या. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर पांड्याच्या डोक्यावरुन सरळ दिशेने सिक्स मारला. राहुलचं आक्रमक रुप पाहून काय करावे आणि काय नाही, असा पेचप्रसंग पांड्यापुढे उभा राहिला. पाचव्या बॉलवर पाडंयाने यॉर्कर बॉल टाकला. यावर त्याने सिंगल काढली. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मनदीपने 2 रन काढल्या. अशा प्रकारे पांड्याच्या ओव्हरमध्ये २५ रन कुटल्या. यानंतर केएल राहुलने हार्दिक पांड्याचा बदला घेतला, अशा पद्धतीच्या पोस्ट आणि मीम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Interviewer - How was the pitch doing after 13 overs ??
Kl rahul - I don't know lekin pandya se coffee ka badla lena tha leliya pic.twitter.com/dC82phyObD— Akulissm (@akul07) April 10, 2019
KL Rahul after hitting 3 sixes and 1 four in Pandya's over. pic.twitter.com/yDAHMO86aJ
— Ashwani (@thatsocialguy_) April 10, 2019
केएल राहुलने मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये शतकी खेळी केली. त्याने 64 बॉलमध्ये 100 रन केल्या. या खेळीत त्याने 6 सिक्स आणि 6 फोर मारले. राहुलच्या शतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईला विजयासाठी 198 रनचे आव्हान दिले. हे आव्हान मुंबईने अखेरच्या बॉलवर पू्र्ण केले. अशाप्रकारे मुंबईने पंजाबचा 3 विकेटने पराभव केला. असे असले तरी पांड्याला 19 व्या ओव्हरमध्ये धुतल्याने राहुल नक्कीच कुठेतरी सुखावला असेल.
मॅच सुरु होण्याच्या काही तासांआधी म्हणजेच दुपारी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल बीसीसीआयच्या लोकपाल समिती समोर उपस्थित राहायचे होते. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल या दोघांना आपले स्पष्टीकरण द्यायचे होते. या दोघांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर १५ एप्रिलच्या आधी निर्णय घेण्यात येणार आहे. कारण १५ एप्रिलला वर्ल्ड कप साठी टीमची घोषणा करण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपच्या टीममध्ये हे दोघे खेळाडू असण्याची दाट शक्यता आहे.